हितगुज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हितगुज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ जुलै, २०१३

बाबा


अनंत विश्वातील असलेलं माझं एक छोटंसं  अस्तित्व केवळ आणी केवळ ज्याच्यामुळे  आहे - तो बाबा

इतरांची मदत न घेता  कन्यांची जबाबदारी समर्थपणे पेलणारा -तो बाबा

आचारातून-विचारातून स्वावलंबनाची  शिकवण देणारा - तो बाबा

स्वतः ऑफिसला चालत जावून मुलींना खाऊसाठी चाराणे -आठाणे बाजूला काढून ठेवणारा - तो बाबा

स्वाभिमानानं जगा आणी जगवा  असं शिकवणारा -तो बाबा

चॉकलेट-बर्फी नेहमी  नाही देता तरी आजोळचा कोकणचा मेवा मात्र मनसोक्त खावू घालणारा- तो बाबा

जीवाभावाचा सखा आणि पुत्र ज्यांच्या आशीर्वादामुळे लाभला - तो बाबा

कधीतरी निवांत वेळी आपलं दु:खं  विसरून तबल्यावर बोल वाजवणारा किंवा सतारीवर तार छेडणारा- तो बाबा

अनंतात विलीन झाला   तरी वारंवार   शतश: त्रिवार वंदन करावसं वाटणारा - तो बाबा

आणी हृदयातील  खोल पोकळीचं अस्तित्वही  पदोपदी  जाणवू देणारा - तो फक्त बाबा आणी  बाबाच
...............
...........
........

आज ह्या महिन्यात तुम्हाला अनंतात विलीन होवून एक  वर्ष पूर्ण  होईल. पण ह्या ३६५ दिवसात असा एकही दिवस गेला नसेल कि तुमची आठवण झाली नाही.

आठवण आली कि हृदयाच्या निसरड्या वाटेवर मन हळूच डोकावतं आणि  आसवांची घळघळ आपोआप डोळ्यातून चालू होते  आणि कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबतच नाही. इतकं का खोल असतं  हे प्रत्येक  बाप-लेकीचं  नातं.   मनानं  जोडलेलं  मनातच खोल रुजलेलं.

लग्नांनंतर तर हे नातं  अधिकच भावूक झालं. तुम्ही होतात  तेव्हाही अनावर आठवण यायची, पण आता अस्तित्व संपलं तरी आठवणी काही केल्या संपतच नाहीत. जिवंत  असताना  वाकून नमस्कार करणं कधी जमलं नाही कधी लाजेखातर, तर कधी वाटलं  नाही म्हणून, पण पूर्वीही आणि  आताही  मात्र तुम्हाला शतश: त्रिवार वंदन कायमच मनातून करत राहिले.

तुम्ही असताना हृदयात  एक जागा होती आदराची, प्रेमाची पण गेल्यावर मात्र हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेलात,........... कधीही न भरून येणारी. या सारखी  दु:खद  भावना यापूर्वी  कधी निर्माण झाली नव्हती. हृदयातील  पोकळीचं  अस्तित्व तुमच्या जाण्यानं जाणवलं अन पावलोपावली जाणवत रहातं.

असं  अचानक निघून जाल असं  कधी वाटलच नव्हतं. तीन महिन्याच्या अवधीत  सगळंच  आटपलं. निमित्त झाले साधं  सर्दी-खोकला, पण पुढे वाढत जावून हॉस्पिटलच्या वा ऱ्या-कफ -लंग्स -किडनी-डायलिसिस सगळं  करुन झालं…………    खूप कंटाळला  होतात  न आयुष्याला. मरणाच्या दाराकडे अगदी खिन्नपणे  टक लावून बसला  होतात.   अन मग एक दिवस सगळंच संपलं  होतं .
…………
……
……


दर वर्षीप्रमाणे शिवरात्रीला,  देवगडला जावून, 'ओम नम: शिवाय' जप ह्या वर्षी करता येणार नाही,  ही  रुखरुख मात्र तुम्हाला शेवटपर्यंत  लागून राहिली होती.
 

२० एप्रि, २०१३

फेसबुक - वेगवेगळ्या नजरेतून

मुझे तो तेरी लत लग गई ........... 
                                             लग गई ......... .....
                                                                  जमाना कहे लत ये गलत लग गई !!!!!!!!!!!



इकडे आबाच्या ढाब्यात (अबू धाबी) आल्यापासून तशी फेसबुकाची सवय झाली.

नकोच , फोटो नकोच लावूया, उगाच कॉपी करून आपल्याच मित्रांना रिक़्वेस्त पाठवतात म्हणे. त्यापेक्षा फोटो रिकामा  ठेवलेला बरा.

अरे बापरे, त्याच्या फोटोला किती लाईक आले. अगदीच फ़ेमस आहे रे तो ! ३ हजार मित्र आहेत त्याचे  फेसबुकवर ? ओ नो !!!

त्यापेक्षा  असं करू का, माझे मित्र इतरांना नको रे दिसायला. उगाचच प्रायवसी जाते.

त्यांचं  काय, बघावं  तेव्हा सारखे नुसते इकडे -तिकडे ट्रिपा  काढत  असतात आणि आले की  टाकतात फोटो फेस्बुकावर. उगाचच फ़्रस्ट्रेशन येतं  ते फोटो बघुन. आमचं कधी फिरायला जाण होतंय देव  जाणे. लाईक तर करूया.

नाहीतरी  दिवसभर घरी काही काम असते का? सारखं उगाच काहीतरी पोस्टत असतात. उगाचच पान  भरून जातात.

फोटो खरच छान  आहे पण  लगेच नको लाईक करायला नाहीतर वाटायचं सारखं फेसबुकवर पडीक असते. नंतर सवडीनं करु.

पण मी म्हणतो,  आपलं  व्यक्तिगत आयुष्य दुसऱ्यांसमोर कशाला उघडं पाडायचं, पर्सनल फोटो नकोच. बाकी काय ते टाकू.

नाही …………… नाही! ……………………… ………………. मी काही त्यातला नाही हं! आमचे फोटो म्हणजे सामाजिक, नैसर्गिक, वैचारिक  असतात कारण आमचा ग्रुप वेगळा आहे ना? आमचं  आपलं वेगळं हं!

ऑफिसातही बघावं तेव्हा स्टाफ निम्मा  वेळ  एफ बी वरच असतो म्हणे.

त्याचं / तिचं स्टेटस सिंगल आहे की कमीटेड कि इंगेज्झ.  रिक्वेस्ट पाठवू का?

माझं नाही रे बाबा तसं, रात्री फक्त एकदा अपडेट्स चेक करतो इतकंच. वेळ कुठे असतो?  एखादा  महत्वाचा निरोप चुकला तर म्हणून आपलं  चेक करतो इतकच.

फेसबुक तर हल्ली चर्च चे फादरच झालेत. कोटेबल कोट्स आणि देवादिकांच्या तसबिरी, हे लाईक करा म्हणजे चांगली खबर ऐकायला मिळेल वगैरे- वगैरे. जनरल नॉलेज मध्ये भर पडते म्हणे.

कोटेबल कोट्स रोज वाचायचा कंटाळा आला तरी त्यातला एखादा आपल्या रोजच्या दिनक्रमात घडलेल्या प्रसंगांशी  मिळता-जुळता  असला कि आपण पटकन लाईक करतो वा  कम्मेंटतो.

काय करू सकाळ झाली की सर्व कामे उरकल्यावर हात आपोआप कम्पुटर कडे वळतात. फक्त पाचच मिनिट करता -करता कधी अर्धा-एक तास निघून जातो ते कळत हि नाही.

मुलाबाळांची मेडलं- प्रशस्तिपत्रक पोस्टताना मात्र आई-वडीलांच्या अंगावर मुठभर मांस अधिक चढतं हे मात्र नक्की.

या वर्चुअल जगाचा एक मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी जगातून कुठेही जोडलेले राहतो हे मात्र खरं. पण हे खरच वर्चुअल असतं नाही ? यात फक्त आनंद व्यक्त केला जातो, पण आतला मत्सर, रोजचं दु:ख, टेन्शन, चिडचिड, एकमेकांबद्दलचे हेवेदावे  बाहेर येवू दिले  जात नाही किंबहुना येवू देवू नये हेही नसे थोडके. 

२ मार्च, २०१३

मी ……. आणि माझं वर्तुळ


आपलं  आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं  नाही!!!!



कुणाला  परिघात घ्यायचं ,
कुणाला परिघावरच ठेवायचं
आणि कुणाला अगदी  परिघाच्या बाहेर.… थोडंसं लांब ……….खूप  लांब ……… आपणच ठरवतो.

परीघावरच्या बिंदूंना आत प्रवेश मिळायला थोडा वेळ लागतो खरं, तर कधी काही बिंदू  अजाणतेपणे हळूच शिरकाव करतात
काही बिंदू आपले-आपण न सांगता परिघाबाहेर जाणं पसंत  करतात
पण काही बिंदूंना मात्र कायम परिघावरच राहण्यात समाधान मानावं लागतं.

परिघातल्या बिंदुंनाही केंद्राबिंदुच्या(स्वतः च्या) किती जवळ आणायचं तेही आपणच ठरवतो.
बिंदूंची   अधिक-वजाबाकी करणंही सोपं असतं,
गुणाकार करताना मात्र थोडा वेळ लागतो
पण भागाकार करतांना दुसऱ्याच्या मनाचे किती सारखे तुकडे झाले याचा मात्र कमी विचार करतो.

केंद्रबिंदूपासून वर्तुळातल्या किंवा  वर्तुळा बाहेरच्या प्रत्येक बिंदुला सरळ रेष काढली तर
काही रेषा पुसट दिसतील तर
काही खूपच गडद भासतील.
काही त्रिज्या बनतील तर
काही दोन्ही टोकाला मिळून व्यास बनतील आणि मध्ये मात्र केंद्रबिंदू होरपळत राहील.

पण अशा  आजपर्यंतच्या किती अगणित रेषा तयार झाल्यात  वा होतील
पण केंद्राबिंदुमात्र  एकच राहील- एकच राहील अगदी  शेवटच्या श्वासापर्यंत.

आणि केंद्रबिंदूच नष्ट झाल्यावर बिचारे आतले बिंदू पुन्हा बाहेर पडतील दुसऱ्या  नवीन  केंद्र-बिंदूच्या शोधात . 

५ जाने, २०१३

नूतन वर्षाच्या उंबरठ्यावर - नात्यातलं टेंशन


 

नवीन वर्ष सुरु झाले नाही का? संकल्प करायचा राहूनच गेला की ? सरत्या वर्षात  आयुष्यात कित्येक गोष्टी घडल्या. म्हणता-म्हणता आता परदेशात  स्थिरावता वर्षही होत आले. . विमानप्रवास हि सारखा घडला. दुबई फिरताना    TOP   OF  THE WORLD  फिरता आलं.  वडिलांचे छत्र नाहीसे झाले आणि आयुष्यात दु:खद , कधीही न भरून निघणारी एक पोकळी  निर्माण झाली .
प्रत्येक टप्प्यावर  नवीन जुळणारी नाती आणि त्यांना जाणून घेताना आपणही एकप्रकारे सज्ञान होत असतो नाही?   माणसाचं  अस्तित्व जगात सारखच जाणवतं.   मानवी प्रश्न मुल्यान्प्रमाणे, लिंगाप्रमाणे, किंवा भौगोलिकदृष्ट्या काही बदलत नाहीत. ते सारखेच राहतात. जन्माची, वाढण्याची आणि मरणाची प्रोसेस  सगळीकडे सारखीच असते. तसेच आनंद  आणि दुखं ही सगळीकडे सगळ्यांना एकसारखीच असतात. रोजच्या आयुष्यात टेन्शन हे तर अटळच.

कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे येणारं टेंशन, काही केल्या त्यातून बाहेर येणे खूप अवघड होऊन जाते.
 गोष्ट कितीही क्षुल्लक वाटली तरीही मनातून विचार काही केल्या जात नाही.
सहवासातल्या व्यक्तींमुळे, आप्तांमुळे येणारं टेंशन.   असं ती/तो कशी वागू शकते? मी तर अशी वागली नव्हते ? मग तीनेच का बरं असं वागावं ? मी किती जमवून घेणाचा प्रयत्न केला पण व्यर्थ. ती/तो तशीच आहे. यापलीकडे मी काही करू शकत नाही. तिनेच मला समजून घ्यायला पाहिजे. नको त्यापेक्षा मी लांबच कशी राहते मग न जमण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आमचे आम्ही बरे. तुमचे तुम्ही बरे. मेंदू ठरवतं कि अग positive विचार कर , sportingly घे. विसरायचं प्रयत्न कर, मनातून काढून टाक, पण नाहीच.
 
 
बापरे! काय हे मन? कसं  समजावू त्याला?  आटोकाट प्रयत्न केला पण छे. किती हा नात्यांमधला  ताण!
 
कधी इतरांचे मन जपण्यासाठी मनात नसतानाही कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर  कधी केवळ आपण आनंदी असल्याचा देखावा करून समोर कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी वाढत्या वयाप्रमाणे सहन न होणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी जोडलेल्या नात्यांसाठी करावी लागणारी तडजोडी मुळे येणारा ताण, तर कधी केलेल्या उपकारांची जाणतेपणे जाण ठेवण्यासाठी चाललेली धडपडी मुळे नकळत येणारा ताण , तर कधी केवळ मनात आले म्हणून कराव्या लागणाऱ्या कृती आणि त्यातून मिळणारे समाधान पण तरीही जाणवणारा ताण, कुठली कृती श्रेष्ठ आणि कुठली अश्रेष्ठ,  कुठलं चूक आणि कुठल बरोबर यात चाललेली मनाची घालमेल आणि त्यामुळे येणारा ताण.
 
हा ताण कायम कुठल्यातरी नात्याशी व स्व:ताशी  जोडलेला असतो. कर्मधर्म संयोगानं जुळलेलं नाते टिकवण्यासाठी कधी दुरूनच हाय आणि बाय एवढंच बरं वाटत असतं, कधी नात्यात मोकळेपणा  नसला तरी मनातून प्रचंड आदर असलेले आदराचं नातं टिकवावसं वाटतं, तर कधी केवळ जुन्या मैत्रीखातर तिचं असंबद्ध बडबड ऐकूनही जपावं वाटणारं मैत्रीचं नातं, तर कधी गोष्टी पटत नसतानाही न सोडावसं वाटणारं वा न सोडता येणारं बांधलेले आप्तस्वकीयाचं   नातं,  तर कधी एखाद्या दिवशी अगदी जीवापलीकडचे वाटणारं नातं दुसऱ्या दिवशी विनाकारण फिकं-फिकं वाटणारं मैत्रीचं  नातं, आपल्या सहवासात असताना जीव लावणारी, पण स्वतःच्या कुटुंबात गेल्यावर मी तुझी कोणी नाही असा भासवणारी छोट्या मुलांची नातीही अनपेक्षित धक्का देतात.
       

प्रत्येक वेळी कितीही ठरवलं मनानं ठरवलं तरीही मनाला खुपलेली  एखादी  गोष्ट काढून टाकणं  खूपच अवघड होऊन जातं. कधी एक दिवस तर कधी कित्येक दिवस, तर कधी कित्येक महिने-वर्षे  त्या खुपलेल्या  गोष्टीचं भुणभुण मनात राहतं.
कितीही विचार केला कि इतरांबद्दल racket (racket म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सारखी चालू असलेली कम्प्लेन मग ती कधी स्वतः बद्दल असते किव्हा इतरांचीही असते) चालवायचे नाही तरी त्यातून बाहेर येणे किती अवघड वाटतं नाही? केवळ अपेक्षा हेच कारण असावं म्हणून त्याबरोबर येणारं अपेक्षाभंगाच दुखःही सहन होत नसावं. मीपणा प्रत्येक वेळी आडवा येतो. मन हे meaning making machineआहे हे माहित असूनही आपल्या विचारा प्रमाणे अर्थ लावण्यात मनाला  एक वेगळच समाधान  मिळत असतं. मनातल्या  little voice  ची भुणभुण सारखी चालू राहते.  आयुष्य stuck झाल्यासारखे, जखडल्यासारखे वाटते.

पूर्वी अगदी छोटी-छोटी कामेही करताना एक प्रकारचा उत्साह असायचा, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद वाटायचा. सगळी कामं  आरामात न कंटाळता केली जायची, पण मग हल्ली असा का होतं बरं? छोट्या-छोट्या गोष्टी सहन होत नाही, स्ट्रेस लेवेल वाढते, चिडचिड होते, आपल्याच मुद्यांवर ठाम राहावंसं वाटतं, stubburn व्हायला होतं. असं परत होऊ द्यायचं नाही असं मनात ठरवूनही परत तसच घडत राहतं आणि अचानक सरत्या वर्षाची शेवटची संध्याकाळ समोर उभी ठाकते आणि मग विचार करू लागते या वर्षी घडलेल्या घटनांचा मागोवा  घेऊ लागते. हे वर्ष चांगलं  होतं  कि वाईट. या वर्षी नाती दुरावली कि जोडली गेली?
नव्या नाती जुळवताना त्यात नवलाई असल्यामुळे नातेसंबंध वाढवण्याचा उत्साह वाढलेला असतो, तर जुन्या नात्यांमधली जवळीक तितकीशी वाढलेली नसते किंवा काही नाती दुरावलेलीही असतात.
सहवासातत्या प्रत्येक चांगल्या-वाईट व्यक्तींमध्ये नक्कीच असे सद्गुण सापडतात जी ज्याचा लवलेशही आपल्याकडे कधीकधी सापडत नाही. मग काही गुणांकडे दुर्लक्ष केले तर नात्यात कधी दुरावा भासणार नाही हेही मनाला पटू लागते.
 मग कुठेतरी शिकल्याचं आठवतं. गांधीजींनी आधी  declare  केले कि 'चले जाव ' हे सगळे  पुढे कसे होणार, काय घडणार  हे त्यांनाही माहित नव्हते. पण possibilities  आपोआप उघडत गेल्या actions  आपोआप घडत  गेल्या  आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे आपण आपल्या आयुष्यात नक्कीच वापरू शकतो.

DECLARE by  words  ----> POSSIBILITIES automatically open


 नवीन वर्षाचे resolution नव्या जोमानं लिहून काढायचे ठरवते.  त्यात हा एक संकल्प कि होऊ वाटणाऱ्या गोष्टी आधी शब्दाने declare  करायच्या, समोरचे दरवाजे आपोआप उघडतील.

नवी नाती फुलवताना जुन्या नात्यांमधील ओरखडे पुसण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. काळाने दुरावलेल्या, कधी विसरलेल्या, तर काही जाणीवपूर्वक दूर सारलेल्या नात्यांमध्ये एक नवीन पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करेन हा हि  अनेक संकल्पापैकी एक संकल्प .


 

२७ नोव्हें, २०१२

मागे वळून पाहता............

 

हो नाही करता करता शेवटी पुतणीच्या लग्नाला भारतात जायचे ठरले तेही अगदी एक दिवस आधी. मुलाची परीक्षा-शाळा, तसेच दोन महिन्यापूर्वीच भारतात जाणे  झालेच होते,  पण शेवटी जायचे ठरले  त्यामुळे तयारी करायलाही वेळ मिळाला नाही. तसेच घाई - गडबडीत पुण्यात पोहोचलो. साखरपुडा  दोन महिने आधीच झाला होता. त्यादिवशी हळदीचा कार्यक्रम, देवक,  दुसऱ्या दिवशी लग्नही सनई-चौघड्याच्या आवाजात अगदी  धुमधडाक्यात  पार पडले. असं  वाटलं  बर  झालं लग्नाला गेलो ते.  नाहीतरी 'लग्न आयुष्यात एकदाच होते नं  काकी......', हा पुतणीचा विचार मनात घर करून राहिला होता!



 तिसऱ्या दिवशी अबू धाबीचा  परतीचा प्रवास होता. पुणे-मुंबई महा मार्गावर मध्येच खोपोलीमध्ये नवऱ्या  मुलीचे सासर असल्याने सत्यनारायणाच्या  पूजेसाठी धावती भेट द्यावी असेही ठरले. नवऱ्या मुलीला, तिच्या  नवऱ्याच्या घरी, हसती पाहून थोडे हायसे वाटले. हळदीकुंकू, ओटी प्रसाद वगैरे घेतला  . जाताना 'काकी' म्हणून गळ्यात  पडली आणि खूप खूप रडली बिचारी.  आम्ही तिचा निरोप घेवून परत गाडीत बसलो

 आणि नकळत विचारचक्र सुरु झाले. शहरात वाढलेली हि मुलगी, ह्या नगरात दिवसभर काय करेल बुवा? नवऱ्याची ड्यूटी थोडी लांब पनवेलला असल्याने त्याला सकाळीच घराबाहेर पडणे भाग असेल. मग हि दिवसभर काय करेल? कि तिचेही आयुष्य तुझ्या-माझ्यासारखेच सासू-सासरे, घरकामे, जेवणखाण  यातच तिचा दिवस निघून जाईल. शिक्षण बिफार्मसी झाले असल्याने पुढे - मागे नोकरी करेल कि जमणार नाही !!!  पण सुट्टीच्या दिवशी ती कुठे फिरायला जाईल बरे . आमची  विकेंड साजरा करायची कल्पना म्हणजे, माल शॉपिंग किंवा पिक्चर किंवा उगाचच भटकणे, खरेदी, मित्रमंडळी इ . मग ती इकडे  काय करेल बरे?  ती व्यवस्थित सेट होईल ना?  सासूसासरे तिच्याशी जमून घेतील न? असे हजारो प्रश्न मनात येऊ लागले.   शेवटी प्रत्येक मुलीचे आयुष्य लग्नानंतर असेच असते हे मनाशी पटवले . माहेरी लाडाकोडात वाढलेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. माहेरची नाळ तोडून  सासरच्या नव्या  नात्यांशी सोयरिक जुळवता-जुळवता ती त्यातच कधी  एकवटून जाते हे तिचे तिलाही कळत नाही. तिच्याबाबतीतही  असेच घडेल हा विश्वास वाटू लागला.

हा विचार करून माझ्याबरोबर  तो ही थोडा अस्वस्थ झाला. परत  गाडीत बसल्यावर  त्याने माझा हात नकळत घट्ट पकडून ठेवला. मी म्हटले काय झालं  रे बाबा ? इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं?   तो म्हणाला - १३ वर्षांपूर्वी  तू ही  अशीच माझ्याबरोबर घरच्यांचा विचार न करता केवळ माझ्या विश्वासावर , सगळं- सगळं  मागे टाकून आली होतीस. आई-वडील, भाऊ-बहिण असलेल्या त्याच्या छोट्याश्या घरात मी ही असाच अलगद, समजून-उमजून  प्रवेश केला होता.  माहेरचा त्यावेळी आधार नसल्याने पुढे काय होईल हेही माहित नव्हते. त्यावेळी माझ्या मनाची  झालेली चलबिचल, माझ्या त्यावेळच्या भावनांचा ओलेपणा  त्याला जाणवला  होता.  त्याच भावना, तीच उत्कटता, तीच अस्वस्थता, तोच उत्साह  आज त्याने,   पुतणीच्या रूपाने ,  १३ वर्षांनी, पुन्हा अनुभवला.

मी केलेल्या so  called त्यागाची (लग्नानंतर प्रत्येक मुलीला कराव्या लागणाऱ्या)   त्याला आवर्जून जाणीव  झाली.  मला  अपेक्षित असलेले  आनंदी आयुष्य तो  देऊ शकला, मी खरोखरीच खूष  आहे ना  ह्याची शाश्वती आणि पावती  माझ्याकडून मिळाल्यावर नकळत त्याचेही डोळे पाणावले आणि तृप्ततेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला.

एक्प्रेस हायवेला गाडी भराभर रस्ता कापत  होती. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी  झाडे अधिकच हिरवीगार भासू लागली. तिचेही सगळं  काही सुरळीत होईल या आशेने आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो होतो.

१२ नोव्हें, २०१२

आजारपणाचे निमित्त

आजारपणाचे निमित्त





मला कुठली गोष्ट होऊ नये  विचारलं तर ती म्हणजे कधी आजारी पडणे. पण माहिती आहे की  याला इलाजच नसतो. बाकी विशेष नाही पण वर्षातून  एक-दोनदा येणारे व्हायरल आजार कधीकधी डोकं वर काढतातच. आजारी पडल्यावर सर्व संसारी स्त्रीयांना   होणारी अडचण म्हणजे घरातल्या कामांचे कसे होणार????? हा एक मोठा प्रश्न  उभा ठाकतो.  इतर कामांचे राहून गेले तरी  चालून जाते पण स्वयंपाकाचे, आणि त्यानंतर लागून येणारी कामे , भांडी, ओटा , फ्रीज मध्ये सारखे ठेवणे-काढणे  याचं  काय?

 एकतर कुटुंबात इनमिन तीन माणसं. जेवायला तिन्ही वेळा तर हवेच त्यात अहोंचे पाक कौशल्य चहा, दुध गरम करणे  आणि मी स्वत: समोर असल्यांवर,     सांगितल्याप्रमाणे,   क्रमाने,  मोजून पदार्थ घालून,  वरणाला घालता येणारी फोडणी,  इथपर्यतच मर्यादित.   आणि नंतर ओट्यावर होणारा पसारा जसेकी लवंडलेली मोहरी,
कांद्या-लसणाची सालपटं,
टोमाटोच्या फोडींच्या गळणाऱ्या  धारा,
अन कोथिंम्बिरीच्या काड्या,
आणि वर भांडयांचा पसारा    बघून आधीच  आजारी असलेल्या मला,  घेरी येण्याचीच बाकी असते.

त्यात इथे दुसऱ्या देशात राहायला आल्यापासून पुण्यातल्या सारखी कामवालीही मदतीला नाही. भांडी, झाडलोट, सणावाराला  स्वयंपाकातही मदत करणारी सुमन, तिची खूपच आठवण येऊ लागते.   इथे कामवालीचा मोठा प्रश्न. बांगलादेशी पुरुषही  इथे घराची कामे करतात  किंवा श्रीलंकन बायका. पण इथल्या कामवालीचा पगारही अवाढव्य.  त्यात तिलाही शुक्रवार-शनिवार सुट्टी, मग फक्त पाचच दिवसांसाठी  कामवाली ठेवावी की   नाही हाही प्रश्न होताच. तिच्या पगारएवढी रक्कम भारतीय चलनात रुपांतर केल्यास होणारी काही  हजार रक्कम. मग तेवढीच रक्कम   माझ्या खात्यात माझ्याच सांगण्याप्रमाणे अगदी ठराविक तारखेला  जमा होत होती. त्यामुळे कामवालीच्या मदतीची अपेक्षा  करणे  चुकीचेच. 

बर हॉटेलांची ही  इथे-अबू धाबीत  बऱ्यापैकी  चलती आहे,  दक्षिण भारतीय लोकं  खूप असल्याने त्यांच्या  पद्धतीची हॉटेलं . एखाद्यावेळी इडली-डोसा-सांभार  चालून जाते पण रोज तेच खाणे, सारखे-सारखे हॉटेल चे खाणे  नको वाटते. घरचे  साधे वरण-भातही  आजारपणात  बरे वाटते. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न काही केल्या  उरतोच.  आणि मग मात्र  त्या काळात अहोंना पूर्ण जाणीव होते ती
                      अरे संसार संसार
                     जसा तवा चुल्यावर
                     आधी हाताला चटके 
                     मग मिळते (बायकोला, मुलाला  आणि मलाही ) भाकर


अश्यातच चार-पाच दिवस गेल्यावर मग जरा बरे वाटू लागते,  बऱ्याच जणांना आजारी असल्यावर औषधं घेतल्यावर गाढ झोप लागते, पण माझे डोळे मात्र टकाटक रात्री उघडे असतात आणि मग अजून चिडचिड होते कारण दुसऱ्या  दिवशीचे स्वयंपाक घराचे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकते आणि मग  खरेच  वाटते हे आजारपण येवूच नये आणि आलेतरी पटकन संपावे.
 

२२ ऑक्टो, २०१२

मी कोण ?????




कुठेतरी ऐकलेले आठवते                      




तुम्ही कोण आहात? -----


 -  आपण जेथे राहतो ते घर,
 -  घर जिथे आहे ते गाव 
 -  ते गाव  ज्या शहरात  आहे ते शहर
 -  ते शहर  ज्या राज्यात आहे ते राज्य
 -  ते राज्य ज्या देशात आहे तो भारत देश
 -  भारत देश आणि असे हजारो देश  ज्या खंडावर आहे ते आशिया खंड-
 -  आशिया खंड आणि उत्तर ध्रुव , दक्षिण ध्रुवा  सकट  अनेक खंड  ज्या पृथ्वीतलावर आहे ती पृथ्वी -
 -  पृथ्वी जी बुध, मंगल गुरु, शनी आणि इतर ग्रहांबरोबर  ज्या आकाशमालेत  आहे ती सूर्यमाला,
 -  असे  अनेक सूर्य आणि त्यांचे ग्रह असलेल्या अनेक  सूर्यमाला मिळून  बनलेली  आकाशगंगा
 -  आणि  अस्तित्वात असलेल्या अशा  अनंत कोटी कोटी  आकाशगंगा


असा व्यापक विचार केला तर आपले अस्तित्व  एक पुसटसे बिंदूही  नाही.
तरीपण आपले विश्व हे आपल्या परीघापर्यंतच  मर्यादित राहते आणि त्या परिघात सामावलेल्या व्यक्ती, दिवसभर ऑफिसात/घरात त्यांची  स्क्रिप्टे   उतरवण्यात कायम बिझी-बिझी  असलेलो आपण. 
(whole day we are busy in writing other persons script -  he should not have behaved like this, he should have done like that, he is responsible for that, not I  ...... )

कधी कधी प्रश्न पडतो------

मी कोण???


कधी वाटते-

थबकले उंबऱ्यात मी, पाहुनी नवी पहाट
जणु जन्मले नव्याने, जडता हा मळवट
हाती संसाराचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका


तर कधी वाटते-
बाबांच्या आयुष्याच्या काही शेवटच्या संध्याकाळी  आजारपणात सोबत घालवलेल्या काही रात्री आणि त्याकाळात करता आलेली त्यांची सेवा यातच आयुष्याची धन्यता मानणारी एक भाग्यवान कन्या.

तर कधी वाटते -
जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आणि लाभलेले अनमोल पुत्ररत्न यांच्याशिवाय दुसरे काहीच न दिसणारी घराच्याच चौकटीत अवघे विश्व सामावलेली आणि त्यातच रमणारी एक सामान्य पतिव्रता(??) - माता(नो ?).


तर कधी वाटते -
आयुष्य एकदाच मिळालेल्या जीवनाचा प्रत्येक क्षण नाविन्य उपभोगण्याची अनावर इच्छया असलेली, कायम मैत्रीच्या विश्वात रमणारी, भिश्या, किट्टी पार्ट्या झोड्णारी, मैत्रीचे अनुबंध जोडणारी-जोपासणारी एक सखी

तर कधी वाटते -
रोजच्या धावपळीत तना च्या स्वस्थतेसाठी शारीरिक व्यायाम , मनाच्या शांततेसाठी मानसिक व्यायाम(मेडीटेशन) यातच relaxation शोधणारी एक जागरूक हेल्थ कॉन्शस आधुनिक स्त्री?

तर कधी वाटते-
स्वत:ला आरशात न बघता, स्वतः कडे बोट न दाखवता दिवसभर इतरांचे मात्र script वर script, script वर script उतरवणारी,
स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्यांना बदलवू पाहणारी ,
स्वत: च्या tension ची कारणे स्वत:त न शोधता बाहेर शोधणारी
आणि ही आपली स्वार्थी वृत्ती, पदोपदी जाणवणारी, जगाच्या पदपथावरील एक पामर.