२ मार्च, २०१३

मी ……. आणि माझं वर्तुळ


आपलं  आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं  नाही!!!!



कुणाला  परिघात घ्यायचं ,
कुणाला परिघावरच ठेवायचं
आणि कुणाला अगदी  परिघाच्या बाहेर.… थोडंसं लांब ……….खूप  लांब ……… आपणच ठरवतो.

परीघावरच्या बिंदूंना आत प्रवेश मिळायला थोडा वेळ लागतो खरं, तर कधी काही बिंदू  अजाणतेपणे हळूच शिरकाव करतात
काही बिंदू आपले-आपण न सांगता परिघाबाहेर जाणं पसंत  करतात
पण काही बिंदूंना मात्र कायम परिघावरच राहण्यात समाधान मानावं लागतं.

परिघातल्या बिंदुंनाही केंद्राबिंदुच्या(स्वतः च्या) किती जवळ आणायचं तेही आपणच ठरवतो.
बिंदूंची   अधिक-वजाबाकी करणंही सोपं असतं,
गुणाकार करताना मात्र थोडा वेळ लागतो
पण भागाकार करतांना दुसऱ्याच्या मनाचे किती सारखे तुकडे झाले याचा मात्र कमी विचार करतो.

केंद्रबिंदूपासून वर्तुळातल्या किंवा  वर्तुळा बाहेरच्या प्रत्येक बिंदुला सरळ रेष काढली तर
काही रेषा पुसट दिसतील तर
काही खूपच गडद भासतील.
काही त्रिज्या बनतील तर
काही दोन्ही टोकाला मिळून व्यास बनतील आणि मध्ये मात्र केंद्रबिंदू होरपळत राहील.

पण अशा  आजपर्यंतच्या किती अगणित रेषा तयार झाल्यात  वा होतील
पण केंद्राबिंदुमात्र  एकच राहील- एकच राहील अगदी  शेवटच्या श्वासापर्यंत.

आणि केंद्रबिंदूच नष्ट झाल्यावर बिचारे आतले बिंदू पुन्हा बाहेर पडतील दुसऱ्या  नवीन  केंद्र-बिंदूच्या शोधात .