९ डिसें, २०१२

किटी पार्टीतील गमतीजमती

 

पुण्यात असताना दिवस कसा जायचा ते कळायचं  नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत सगळी कामं  आवरून झाल्यावर (अर्थात कामवालीच्या मदतीने) अगदी  १-२ तास, मुले घरी येईपर्यंत निवांत वेळ असायचा. सोसायटीतल्या मैत्रिणी बऱ्यापैकी  एकाच एजग्रूप मधल्या. 'career oriented  वरून ' home oriented' कडे  झुकलेल्या. मग कधी रुचीकडे, तर कधी जुहीकडे, तर कधी माझ्याकडे  चहा पार्टी असायची.   किटीत १३-१४ जणींचा  ग्रुप होता. पण  रोजच सगळ्यांना येणे जमत नसले तरी  ७-८ जणी  एकत्र जमल्या कि  रोजच्या गप्पा, मुलांवरच्या, घरातल्या, तब्येतीबद्दलच्या गप्पांना उत येत असे. नाहीतर मग  पुढच्या किटी पार्टीची चर्चा.  पण दीड-दोन तास वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही.
गप्पाटप्पांच्या  ओघात  खळखळून हसणेही  व्हायचे. मनावरची  मरगळ हलकेच दूर व्हायची.   मन मोकळे करायला  मिळायचं.

तर हि किटी महिन्यातून एकदा ठेवली जायची.  (बाकी क्लबातल्या  पत्यांच्या  हाय-फाय किटी प्रमाणे नाही हं!!)    'भिशी' हे  नाव जरा कसतरीच वाटतं नं ,  म्हणून 'किटी' हा सोज्वळ शब्द. किटीत ना  नवऱ्याची लुडबुड, न पोरांचा गोंधळ. जिच्या घरी किटी असेल ती काहीतरी थीम ठेवायची आणि सगळ्यांनी त्या थीमला अनुसरून काहीतरी करून यायचे.  जसे की  पहिल्या वर्षी  विविध रंगांच्या लाल, निळा, हिरवा, गुलाबी   सगळ्या  रंगांच्या थीम ठेवून झाल्या.  सगळ्या जणी  एकाच रंगात  तयार होवून आल्यावर किटीचे  माहोल अगदी कोणाकडे सण -समारंभ  असल्यासारखे वाटायचे,           किटी   असणाऱ्या  मैत्रिणीची  पहाटेपासूनची  लगबग तर विचारायलाच नको. चार-आठ दिवस आधीच तिची तयारी चालू असते.

दुसऱ्यांदा   अगदी ऋतूप्रमाणे थीम ठेवायचे ठरले.  जसेकी श्रावणात वैशालीची थीम होती एम्रॉयडरी आणि मेंदी. मग काय  विचारता. बरेच दिवस एकमेकींच्या हातावर मेंदी फासणे, सराव  करणे सुरु झाले. पण काहींना मेहेंदी काढताच येत नव्हती. मग सगळ्यांनी ठरवले कि मेहेंदी काढणाऱ्यालाच बोलवूया.  आदल्यादिवशी शोप्पिंग माल मधल्या  मेंदी काढणाऱ्याला  बोलावून  सगळ्यांचे हात एकाच दिवशी रंगून झाले. दोन्ही हात मेंदीने  रंगले असल्यामुळे,   स्वयंपाकाला   मात्र त्या दिवशी रात्रीची  हक्काची विश्रांती मिळाली. पुढच्या दिवशी-किटीच्या दिवशी मेंदीच्या भरगच्च रंगलेल्या हातां बरोबर,  आमची पार्टीही,  मेहेंदीच्या लाल रंगात  अधिकच गडद  रंगली.

 मधूने  तिची थीम ठेवली होती ' केशभूषा hairstyle ' मग काय विचारता? दिवसभर एकमेकींच्या केसांशी खेळ सुरु झाले. कधी पार्लरमधून, तर कधी नेटची मदत घेवून, तर कधी इतर मैत्रिणींची मदत घेवून  भरपूर   हेअर-स्टाईल  शिकून झाल्या. कॅर्लर-स्त्रेटनरची खरेदी झाली. काही जणी जसे मीनल, नेहा, सिमरन, आनंदिता   थीममध्ये  परफेक्ट उतरण्यात अगदीच निष्णात.  डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत पूर्ण थीम प्रमाणे बेमालूम सजून येणार.   ( नखशिखांत म्हणतात नाही का? मराठी शब्दच पटकन  आठवत नाहीत आणि कधी कधी मराठी ऐवजी इंग्रजी शब्द - over time  pregnant, project , delivery, maintainance, tour इ  अनाहतपणे तोंडात येतातच)  एकमेकींपासून प्रेरणा घेऊन सगळ्याजणी थोडे फार का होईना थीमप्रमाणे तयार होवून यायच्याच. कधी school -girl  बनून जायचे असायचे, तर कधी मिनी-मिडी मध्ये, तर कधी इंडो-वेस्टर्न स्टाईल, ग्रीष्मात फक्त सुती कपडे,  तर कधी बांधणी प्रिंट तर कधी प्रांताप्रमाणे पारंपारिक पेहराव, तर कधी ग्रामीण पेहराव.

एकदा प्रीसीने   थीम ठेवली  होती  wedding.  लग्नाच्या वेळचा आपापला पेहराव करायचा होता.   सर्वांना   नवरी  बनून जायचे होते  आणि प्रत्येकीने  लग्ना बद्दलची एक-एक गोड-कडू आठवण सांगायची  होती. सगळ्याजणी साधारण २५-३८ वयोगटातील होत्या प्रत्येकीला आठवणी सांगताना त्यावेळच्या क्षणांची अनावर  आठवण झाली आणि तेवढ्याच भावूक झाल्या. आनंदिताने सांगितले' तिच्या लग्नाच्यावेळी सर्व व्यवस्था वधूपक्षा कडे होती. नवरा मुलगा केवळ वर-पक्षाच्या खोलीत  झुरळे  सापडली म्हणून  घरची मंडळी त्याला बोहल्यावर चढवायला तयार नव्हती.   मग सगळी साफसफाई करून दिल्यावर तयार झाले म्हणे.  संध्याकाळी ठरलेले लग्न रात्री उशिरा लागले.  एकीने  सांगितले' फिरायला गेले असताना नवरी घोड्यावरून पडली म्हणून खुदकन हसणारा तिचा नवरा, नंतर त्याने तिची  माफी मागितली ती गोष्ट वेगळी.  रुचीने तर तिच्या पतिराजांना एकदम लग्नातच बघितले. आधी फोटो पाहूनच लग्न पक्के झाले होते. नव्या नवरीचा अनुभव प्रत्येकीला केव्हाच   ५-१५ वर्षे मागे घेवून गेला होता. एकमेकींच्या भावविश्वाशी जवळीक साधता-साधता  ३-४ तास कसे संपून गेले ते कळलेही नाही.

सिमरनची थीम होती प्रत्येकीने एक व्यक्तिचित्र  बनून जायचे होते. माधुरी 'माधुरी  दिक्षित' बनून आली होती, जुही ' बिपाशा बसू',  मीनल 'झीनातामान'  आनंदिता  'परवीन बाबी' वगेरे.  त्यावेळी प्रिसि मुळची, तामिळनाडू मधील  असल्याने 'जयललिता' बनली होती  आणि तिने एक छानदार  भाषणही  ठोकले. तिने   तिच्या मंत्रालयात आम्हाला  कुणाला  शिक्षणमंत्री केले तर कुणाला पंतप्रधान, तर कुणी शेतीमंत्री झाले. प्रत्येक जण आपापले खाते सांभाळण्यात कसे निष्णात आहेत हेही तिने भाषणात  सांगितले.
 वैशालीने तर कहरच केला. प्रत्येकीची नक्कल तिने अगदी हुबेहूब उतरवली.   रोजच्या संभाषणात  एकदातरी उच्चारली जाणारी वाक्ये त्यांचाच स्टा इल मध्ये,   तिच्या तोंडी ऐकून दिलखुलास हसलो. जसे कि
मीनल ----'पर्ररर्र ' हा  शब्द तिच्या बोलण्यात  रोज एकदातरी यायचाच.
रुची -------' मेरे अंशू को भी थोडा रखना यार ?'
आनंदिता  ------' ए रिशिका और शुभांगी ने तो मेरे नाक मे दम कर रखा  है'
खालिदा -----' फिरोज को तो ऐसा नही चलता'
माधुरी ----- ' नाही गं, आज ह्यांना  दुपारी  डबा द्यायचाय  नं!!!'
जुही ---- ' रुक न यार. बस और पाच मिनट, ओ मोटी कैसी है रे तू ?'

प्रत्येकीची नक्कल अगदी हुबेहूब.



 किटीत खाण्याबरोबर दोन खेळही ठेवले जायचे. खाण्याची तर खूपच चंगळ असायची. महिन्यातून एकदा प्रत्येकीच्या हातची चव चाखायला मिळायची. १२-१५ महिन्यातून फक्त एकदाच जेवणाचा बेत करायचा असल्याने सगळे पदार्थ घरीच करायचे होते, पण पुढे वर्षभर  मात्र इतरांच्या हातचे खायचे होते त्यामुळे किटी साठी जेवणाचा बेत ठेवायला सगळ्याजणी  तयार झाल्या.  बरं , खेळाचे विषय असायचे एका मिनिटाचे जसे कि एका मिनिटात बलून फुगवणे, मेणबत्त्या पेटवणे वगैरे. एकतर स्किल गेम किव्हा लक गेम.

माधुरीने नवीनच करावके सिस्टीम घेतली होती. त्यामुळे तिच्याकडे 'गाण्यांची महफिल' ठेवली होती. काहींनी सुरेल आवाजात, तर काहींनी येईल तश्या जाड्या-भरड्या आवाजात जुन्या मराठी-हिंदी-इंग्रजी  फिल्मी गाण्यांची महेफील मस्तच जमली. जयंतीचा तर गाणं हा तर आवडीचा विषय. तिनेही सुरेल आवाजात गाणी म्हटली. जुनी गाणी दिवसभर मनात रुंजी घालत होती. त्या दिवशी अक्ख्या सोसायटीला नवव्या मजल्यावरून गाणी ऐकू आली असावीत.

एकदा अशीच आमची किटी चालू होती  माझ्याकडे. खेळाचा विषय होता एका मिनिटात " नवऱ्याला प्रेमपत्र" लिहायचे होते कि ज्यामध्ये 'प्रेम' हा शब्द जास्तीत जास्त वेळा आला पाहिजे होता. काही मैत्रिणी वेगवेगळ्या राज्यातील असल्याने आपल्या मातृभाषेतही लिहिण्याची परवानगी होती. सगळ्यांनी दोनचार वाक्ये साधारण किंवा romantic  लिहिली होती. पण एका मैत्रिणीने   खूप गमतीशीर पत्र लिहिले होते.

प्रिय  xxx ,
मै तुम्हे प्यार करती हू
मै तुम्हारे मम्मिसे प्यार करती हू
मै तुम्हारे पापासे प्यार करती हू
मै तुम्हारे भाई से प्यार करती हू
मै तुम्हारे बहन से प्यार करती हू
मै तुम्हे बाथरूम मे प्यार करती हू, बेडरूम मी भी प्यार करती हू
मै तुम्हारे पेन से प्यार करती हू
मै तुम्हारे शर्ट से प्यार करती हू
मै तुमसे प्यारही प्यार, बहुत प्यार करती हू

उत्तराने सगळ्या पत्रांचे वाचन केले. तिच्या पत्राचे सामुहिक  वाचन झाल्यावर सगळ्यांजणी  अगदी हसून-हसून थकल्या. आणि तिच्या पत्रात 'प्रेम' हा शब्द जास्त वेळा आल्याने अर्थात तिला गिफ्ट देण्यात आले. परत एकत्र भेटलो कि हा विषय वारंवार निघत असे. आणि आम्ही परतपरत पोट धरून हसत असू, हा विषय अगदी महिनाभर पुरला.


आणखी काही दिवसांनी 'knowledge club ' सुरु केला. यात प्रत्येक खेपेला एक विषय घेऊन  जसे कि स्वास्थ्य, स्त्रियांचे मानसिक-शारीरिक आरोग्य, आयुर्वेद, ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय, योग आणि योगासने, मुलांचे प्रश्न हळूहळू एक-एक विषय सुचत जावू लागले आणि 'knowledge club 'चा पसारही वाढला.

नंतर  ठरवलं  कि आपल्याकडून काहीतरी समाजकार्य झाले पाहिजे. मग भारतीने एक छान कल्पना लढवली. दर महिन्याच्या ठराविक तारखेला आम्ही अख्ख्या  सोसायटीतले न्यूज-पेपर गोळा करू लागलो आणि मग महिन्याची रद्दी, रद्दीवाल्याला विकून जमा होणारी  रक्कम सामाजिक संस्थेला देणगी स्वरुपात देऊ  लागलो. ह्या कामातही सगळ्यांनी थोडाफार का होईना आपापल्या परीने खारीचा वाटा  उचलला होता.

 प्राथमिक शाळेतल्या बालिश  मैत्रिणी, माध्यमिक शाळेतल्या जाणीवपूर्वक झालेल्या मैत्रिणी, तर कधी कॉलेजच्या, ऑफिसच्या मित्रमैत्रिणी, आणि  आता ह्या किटीच्या मैत्रिणी  वेगवेगळ्या वळणांवर  भेटणाऱ्या  मैत्रिणी ज्यांच्यात आपण कधी एकरूप  होऊन जातो ते  कळतच नाही. रुसवे-फुगवेही व्हायचे पण डान्स -डिब्बा  पार्टीनंतर (तीही कधीकधी व्हायची कि ज्यात फक्त डब्बा नी डान्स अंतर्भूत होतं ज्यात रुसव्या-फुगाव्यांनाही वाट मोकळी करून दिली जायची )  पुनःश्च   एकत्र येणाऱ्या  मैत्रिणी.

मैत्रीचे विश्वच आयुष्यातला एक  सुखद  आपसूक उघडणारा कप्पा   असतो नाही ,  मैत्रीच्या पुस्तकाची पाने पुढे वाढत राहिली तरी मागे उलटून पहावीशी वाटतातच !!!


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा