अनंत विश्वातील असलेलं माझं एक छोटंसं अस्तित्व केवळ आणी केवळ ज्याच्यामुळे आहे - तो बाबा
इतरांची मदत न घेता कन्यांची जबाबदारी समर्थपणे पेलणारा -तो बाबा
आचारातून-विचारातून स्वावलंबनाची शिकवण देणारा - तो बाबा
स्वतः ऑफिसला चालत जावून मुलींना खाऊसाठी चाराणे -आठाणे बाजूला काढून ठेवणारा - तो बाबा
स्वाभिमानानं जगा आणी जगवा असं शिकवणारा -तो बाबा
चॉकलेट-बर्फी नेहमी नाही देता तरी आजोळचा कोकणचा मेवा मात्र मनसोक्त खावू घालणारा- तो बाबा
जीवाभावाचा सखा आणि पुत्र ज्यांच्या आशीर्वादामुळे लाभला - तो बाबा
कधीतरी निवांत वेळी आपलं दु:खं विसरून तबल्यावर बोल वाजवणारा किंवा सतारीवर तार छेडणारा- तो बाबा
अनंतात विलीन झाला तरी वारंवार शतश: त्रिवार वंदन करावसं वाटणारा - तो बाबा
आणी हृदयातील खोल पोकळीचं अस्तित्वही पदोपदी जाणवू देणारा - तो फक्त बाबा आणी बाबाच
...............
...........
........
आज ह्या महिन्यात तुम्हाला अनंतात विलीन होवून एक वर्ष पूर्ण होईल. पण ह्या ३६५ दिवसात असा एकही दिवस गेला नसेल कि तुमची आठवण झाली नाही.
आठवण आली कि हृदयाच्या निसरड्या वाटेवर मन हळूच डोकावतं आणि आसवांची घळघळ आपोआप डोळ्यातून चालू होते आणि कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबतच नाही. इतकं का खोल असतं हे प्रत्येक बाप-लेकीचं नातं. मनानं जोडलेलं मनातच खोल रुजलेलं.
लग्नांनंतर तर हे नातं अधिकच भावूक झालं. तुम्ही होतात तेव्हाही अनावर आठवण यायची, पण आता अस्तित्व संपलं तरी आठवणी काही केल्या संपतच नाहीत. जिवंत असताना वाकून नमस्कार करणं कधी जमलं नाही कधी लाजेखातर, तर कधी वाटलं नाही म्हणून, पण पूर्वीही आणि आताही मात्र तुम्हाला शतश: त्रिवार वंदन कायमच मनातून करत राहिले.
तुम्ही असताना हृदयात एक जागा होती आदराची, प्रेमाची पण गेल्यावर मात्र हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेलात,........... कधीही न भरून येणारी. या सारखी दु:खद भावना यापूर्वी कधी निर्माण झाली नव्हती. हृदयातील पोकळीचं अस्तित्व तुमच्या जाण्यानं जाणवलं अन पावलोपावली जाणवत रहातं.
असं अचानक निघून जाल असं कधी वाटलच नव्हतं. तीन महिन्याच्या अवधीत सगळंच आटपलं. निमित्त झाले साधं सर्दी-खोकला, पण पुढे वाढत जावून हॉस्पिटलच्या वा ऱ्या-कफ -लंग्स -किडनी-डायलिसिस सगळं करुन झालं………… खूप कंटाळला होतात न आयुष्याला. मरणाच्या दाराकडे अगदी खिन्नपणे टक लावून बसला होतात. अन मग एक दिवस सगळंच संपलं होतं .
…………
……
……
दर वर्षीप्रमाणे शिवरात्रीला, देवगडला जावून, 'ओम नम: शिवाय' जप ह्या वर्षी करता येणार नाही, ही रुखरुख मात्र तुम्हाला शेवटपर्यंत लागून राहिली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा