हो नाही करता करता शेवटी पुतणीच्या लग्नाला भारतात जायचे ठरले तेही अगदी एक दिवस आधी. मुलाची परीक्षा-शाळा, तसेच दोन महिन्यापूर्वीच भारतात जाणे झालेच होते, पण शेवटी जायचे ठरले त्यामुळे तयारी करायलाही वेळ मिळाला नाही. तसेच घाई - गडबडीत पुण्यात पोहोचलो. साखरपुडा दोन महिने आधीच झाला होता. त्यादिवशी हळदीचा कार्यक्रम, देवक, दुसऱ्या दिवशी लग्नही सनई-चौघड्याच्या आवाजात अगदी धुमधडाक्यात पार पडले. असं वाटलं बर झालं लग्नाला गेलो ते. नाहीतरी 'लग्न आयुष्यात एकदाच होते नं काकी......', हा पुतणीचा विचार मनात घर करून राहिला होता!
तिसऱ्या दिवशी अबू धाबीचा परतीचा प्रवास होता. पुणे-मुंबई महा मार्गावर मध्येच खोपोलीमध्ये नवऱ्या मुलीचे सासर असल्याने सत्यनारायणाच्या पूजेसाठी धावती भेट द्यावी असेही ठरले. नवऱ्या मुलीला, तिच्या नवऱ्याच्या घरी, हसती पाहून थोडे हायसे वाटले. हळदीकुंकू, ओटी प्रसाद वगैरे घेतला . जाताना 'काकी' म्हणून गळ्यात पडली आणि खूप खूप रडली बिचारी. आम्ही तिचा निरोप घेवून परत गाडीत बसलो
आणि नकळत विचारचक्र सुरु झाले. शहरात वाढलेली हि मुलगी, ह्या नगरात दिवसभर काय करेल बुवा? नवऱ्याची ड्यूटी थोडी लांब पनवेलला असल्याने त्याला सकाळीच घराबाहेर पडणे भाग असेल. मग हि दिवसभर काय करेल? कि तिचेही आयुष्य तुझ्या-माझ्यासारखेच सासू-सासरे, घरकामे, जेवणखाण यातच तिचा दिवस निघून जाईल. शिक्षण बिफार्मसी झाले असल्याने पुढे - मागे नोकरी करेल कि जमणार नाही !!! पण सुट्टीच्या दिवशी ती कुठे फिरायला जाईल बरे . आमची विकेंड साजरा करायची कल्पना म्हणजे, माल शॉपिंग किंवा पिक्चर किंवा उगाचच भटकणे, खरेदी, मित्रमंडळी इ . मग ती इकडे काय करेल बरे? ती व्यवस्थित सेट होईल ना? सासूसासरे तिच्याशी जमून घेतील न? असे हजारो प्रश्न मनात येऊ लागले. शेवटी प्रत्येक मुलीचे आयुष्य लग्नानंतर असेच असते हे मनाशी पटवले . माहेरी लाडाकोडात वाढलेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. माहेरची नाळ तोडून सासरच्या नव्या नात्यांशी सोयरिक जुळवता-जुळवता ती त्यातच कधी एकवटून जाते हे तिचे तिलाही कळत नाही. तिच्याबाबतीतही असेच घडेल हा विश्वास वाटू लागला.
हा विचार करून माझ्याबरोबर तो ही थोडा अस्वस्थ झाला. परत गाडीत बसल्यावर त्याने माझा हात नकळत घट्ट पकडून ठेवला. मी म्हटले काय झालं रे बाबा ? इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं? तो म्हणाला - १३ वर्षांपूर्वी तू ही अशीच माझ्याबरोबर घरच्यांचा विचार न करता केवळ माझ्या विश्वासावर , सगळं- सगळं मागे टाकून आली होतीस. आई-वडील, भाऊ-बहिण असलेल्या त्याच्या छोट्याश्या घरात मी ही असाच अलगद, समजून-उमजून प्रवेश केला होता. माहेरचा त्यावेळी आधार नसल्याने पुढे काय होईल हेही माहित नव्हते. त्यावेळी माझ्या मनाची झालेली चलबिचल, माझ्या त्यावेळच्या भावनांचा ओलेपणा त्याला जाणवला होता. त्याच भावना, तीच उत्कटता, तीच अस्वस्थता, तोच उत्साह आज त्याने, पुतणीच्या रूपाने , १३ वर्षांनी, पुन्हा अनुभवला.
मी केलेल्या so called त्यागाची (लग्नानंतर प्रत्येक मुलीला कराव्या लागणाऱ्या) त्याला आवर्जून जाणीव झाली. मला अपेक्षित असलेले आनंदी आयुष्य तो देऊ शकला, मी खरोखरीच खूष आहे ना ह्याची शाश्वती आणि पावती माझ्याकडून मिळाल्यावर नकळत त्याचेही डोळे पाणावले आणि तृप्ततेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला.
एक्प्रेस हायवेला गाडी भराभर रस्ता कापत होती. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी झाडे अधिकच हिरवीगार भासू लागली. तिचेही सगळं काही सुरळीत होईल या आशेने आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो होतो.