१२ नोव्हें, २०१२

आजारपणाचे निमित्त

आजारपणाचे निमित्त





मला कुठली गोष्ट होऊ नये  विचारलं तर ती म्हणजे कधी आजारी पडणे. पण माहिती आहे की  याला इलाजच नसतो. बाकी विशेष नाही पण वर्षातून  एक-दोनदा येणारे व्हायरल आजार कधीकधी डोकं वर काढतातच. आजारी पडल्यावर सर्व संसारी स्त्रीयांना   होणारी अडचण म्हणजे घरातल्या कामांचे कसे होणार????? हा एक मोठा प्रश्न  उभा ठाकतो.  इतर कामांचे राहून गेले तरी  चालून जाते पण स्वयंपाकाचे, आणि त्यानंतर लागून येणारी कामे , भांडी, ओटा , फ्रीज मध्ये सारखे ठेवणे-काढणे  याचं  काय?

 एकतर कुटुंबात इनमिन तीन माणसं. जेवायला तिन्ही वेळा तर हवेच त्यात अहोंचे पाक कौशल्य चहा, दुध गरम करणे  आणि मी स्वत: समोर असल्यांवर,     सांगितल्याप्रमाणे,   क्रमाने,  मोजून पदार्थ घालून,  वरणाला घालता येणारी फोडणी,  इथपर्यतच मर्यादित.   आणि नंतर ओट्यावर होणारा पसारा जसेकी लवंडलेली मोहरी,
कांद्या-लसणाची सालपटं,
टोमाटोच्या फोडींच्या गळणाऱ्या  धारा,
अन कोथिंम्बिरीच्या काड्या,
आणि वर भांडयांचा पसारा    बघून आधीच  आजारी असलेल्या मला,  घेरी येण्याचीच बाकी असते.

त्यात इथे दुसऱ्या देशात राहायला आल्यापासून पुण्यातल्या सारखी कामवालीही मदतीला नाही. भांडी, झाडलोट, सणावाराला  स्वयंपाकातही मदत करणारी सुमन, तिची खूपच आठवण येऊ लागते.   इथे कामवालीचा मोठा प्रश्न. बांगलादेशी पुरुषही  इथे घराची कामे करतात  किंवा श्रीलंकन बायका. पण इथल्या कामवालीचा पगारही अवाढव्य.  त्यात तिलाही शुक्रवार-शनिवार सुट्टी, मग फक्त पाचच दिवसांसाठी  कामवाली ठेवावी की   नाही हाही प्रश्न होताच. तिच्या पगारएवढी रक्कम भारतीय चलनात रुपांतर केल्यास होणारी काही  हजार रक्कम. मग तेवढीच रक्कम   माझ्या खात्यात माझ्याच सांगण्याप्रमाणे अगदी ठराविक तारखेला  जमा होत होती. त्यामुळे कामवालीच्या मदतीची अपेक्षा  करणे  चुकीचेच. 

बर हॉटेलांची ही  इथे-अबू धाबीत  बऱ्यापैकी  चलती आहे,  दक्षिण भारतीय लोकं  खूप असल्याने त्यांच्या  पद्धतीची हॉटेलं . एखाद्यावेळी इडली-डोसा-सांभार  चालून जाते पण रोज तेच खाणे, सारखे-सारखे हॉटेल चे खाणे  नको वाटते. घरचे  साधे वरण-भातही  आजारपणात  बरे वाटते. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न काही केल्या  उरतोच.  आणि मग मात्र  त्या काळात अहोंना पूर्ण जाणीव होते ती
                      अरे संसार संसार
                     जसा तवा चुल्यावर
                     आधी हाताला चटके 
                     मग मिळते (बायकोला, मुलाला  आणि मलाही ) भाकर


अश्यातच चार-पाच दिवस गेल्यावर मग जरा बरे वाटू लागते,  बऱ्याच जणांना आजारी असल्यावर औषधं घेतल्यावर गाढ झोप लागते, पण माझे डोळे मात्र टकाटक रात्री उघडे असतात आणि मग अजून चिडचिड होते कारण दुसऱ्या  दिवशीचे स्वयंपाक घराचे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकते आणि मग  खरेच  वाटते हे आजारपण येवूच नये आणि आलेतरी पटकन संपावे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा