तिचे अस्तित्व अलिप्त, अपर्याप्त ..... अव्यक्त
ती अगदी लहान असल्यापासून एक नेहमीसारखी शाळेत जाणारी एक गोंडस कळी होती. स्वातंत्र्य मिळायच्या आधीच्या एक वर्ष आधीचा तिचा जन्म. त्याकाळची १० वी म्हणजे शिक्षणाचा ब-यापैकी मोठा पल्ला म्हणायचं. बघता बघता शिक्षण संपून लग्नही झाले. शहरातल्या एका औषध कंपनीत नोकरीही थोडे दिवस चालू होती. सर्व काही सुरळीत चालू होते.
पदरी लगोलग दोन मुलीही झाल्या. कर्मधर्मसंयोगाने तिसरीही मुलगी झाली आणि काही कळायच्या आताच तिला वेडा चे झटके येवू लागले. छोट्या मुलींना तर जग म्हणजे काय हेही कळत नव्हते. थोडे काही झाले तर आईच्या कुशीत लपू पाहणारे मुल, त्यांना जवळ घ्यावे हे ही तीला कळत नव्हते . हळूहळू घरात भांड्यांची आदळ आपट , वायफळ बडबड करणे, मुलींना मारझोड करणे सुरु झाले. अहोंनाही तिला कसे आवरावे कळत नव्हते. डॉक्टरी उपायही करून झाले. पण परिस्थिती जैसे थे. मग घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही होणारा त्रास कमी करण्यासाठी, खात्रीचा उपाय म्हणून शेवटी कोर्टाची परवानगी घेवून तिला उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गोळ्या-औषधे, शॉकट्रीटमेन्ट इ. इलाज झाल्यावर घरी आणण्यात आले. थोड्या दिवसांनी परत तीच कथा. त्यातच पदरात आणखीन एक कन्ये ची भर पडली. पुन्हा दोनतीनदा मेंटल हॉस्पिटलचे दौरे-तीच शॉक ट्रीटमेन्ट , तिच्या जीवाची आणखीनच घालमेल होत होती. पण नव-यापुढेही दुसरा इलाजच नव्हता. यातच पुढची १०-१२ वर्षे गेली.
मग कोणी ओळखीच्यांनी सुचवल्यावर मानसिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु केला. आणि तिचे तऱ्हेवाईक वागणं व बोलणे ब-यापैकी आवाक्यात आले. पण त्यानंतर ती एक लहान मुलच झाली. घराची चौकट न ओलांडता येणारी, रोजची औषधे, जेवणे , झोपणे आणि लहान मुलासारखेच भांडणे, हट्ट करणे हाच दिनक्रम आजतागायत सुरु आहे. कधी कधी वाटते यात तिची स्वत:ची काय चूक होती. तिनेही एका सामान्य स्त्रीसारखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण दैवाने तिला काय दाखवले? अजूनही गेली ३०-३५ वर्षे ती गोळ्या औषधे यांच्याच गर्तेत अडकली आहे. दुर्देवाने त्यातच पडण्याचे निमित्त होवून आलेले पंगुत्व. वॉंकरचा आधार घेवून घरातल्या घरात चालता येण्याजोगी स्थिती. पण तिचे मन मात्र कायम एका लहान मुलासारखेच.
लहान मुलासारखेच भांडणारी,
वेगळे काही खायला हवे म्हणून अट्टाहास करणारी ,
कधी शरीराच्या दुखणाऱ्या, थकलेल्या अवयवांची जाणीव होणारी ,
नकळत अश्रूंनी भरून येणारे, पण कारण न सांगता येणारे तिचे डोळे,
मधेच अनंतात विलीन झालेल्या अहोंची अस्वस्थ करणारी आठवण,
मधेच तिला कधी रिक्ष्याने ऑफिसला असते, तर कधी कोणी गावाला बोलावलेले असते, कधी मुली सासरहून येऊन दारात उभ्या असतात असे होणारे विचित्र भास,
तर कधी स्वत:चीच स्वत:शी चाललेली मुक्त बडबड.
मघ कधी कधी प्रश्न पडतो? काही व्यक्तींच्या बाबतीत असे का घडते? यालाच नशीब म्हणायचे कि आपण स्वत:च आपले नशीब घडवू शकतो यावर विश्वास ठेवावा कि नाही हा पडणारा प्रश्न,
किंवा पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसणाऱ्या, आणि त्या दोन श्वासांच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांचे उत्तरदायित्व आपण स्वत: स्वीकारावे का ?
की , पूर्वजन्माचे संचित कर्म ?????
पूर्वजन्मीचे संचीत कर्म मानले तरी मग तिला स्वत:ला या जन्मात , पापपुण्याचा हिशोब करण्याची एक संधी, नवीन कर्म संचयनाचा काहीच अधिकार नाही का ?
पूर्वजन्मीचे संचीत कर्म मानले तरी मग तिला स्वत:ला या जन्मात , पापपुण्याचा हिशोब करण्याची एक संधी, नवीन कर्म संचयनाचा काहीच अधिकार नाही का ?
नकळत कवयत्रीच्या ओळी आठवतात.
त्या पैलतीरावर .............. मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ ......... सोबत आणि उबारा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा