९ डिसें, २०१२

किटी पार्टीतील गमतीजमती

 

पुण्यात असताना दिवस कसा जायचा ते कळायचं  नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत सगळी कामं  आवरून झाल्यावर (अर्थात कामवालीच्या मदतीने) अगदी  १-२ तास, मुले घरी येईपर्यंत निवांत वेळ असायचा. सोसायटीतल्या मैत्रिणी बऱ्यापैकी  एकाच एजग्रूप मधल्या. 'career oriented  वरून ' home oriented' कडे  झुकलेल्या. मग कधी रुचीकडे, तर कधी जुहीकडे, तर कधी माझ्याकडे  चहा पार्टी असायची.   किटीत १३-१४ जणींचा  ग्रुप होता. पण  रोजच सगळ्यांना येणे जमत नसले तरी  ७-८ जणी  एकत्र जमल्या कि  रोजच्या गप्पा, मुलांवरच्या, घरातल्या, तब्येतीबद्दलच्या गप्पांना उत येत असे. नाहीतर मग  पुढच्या किटी पार्टीची चर्चा.  पण दीड-दोन तास वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही.
गप्पाटप्पांच्या  ओघात  खळखळून हसणेही  व्हायचे. मनावरची  मरगळ हलकेच दूर व्हायची.   मन मोकळे करायला  मिळायचं.

तर हि किटी महिन्यातून एकदा ठेवली जायची.  (बाकी क्लबातल्या  पत्यांच्या  हाय-फाय किटी प्रमाणे नाही हं!!)    'भिशी' हे  नाव जरा कसतरीच वाटतं नं ,  म्हणून 'किटी' हा सोज्वळ शब्द. किटीत ना  नवऱ्याची लुडबुड, न पोरांचा गोंधळ. जिच्या घरी किटी असेल ती काहीतरी थीम ठेवायची आणि सगळ्यांनी त्या थीमला अनुसरून काहीतरी करून यायचे.  जसे की  पहिल्या वर्षी  विविध रंगांच्या लाल, निळा, हिरवा, गुलाबी   सगळ्या  रंगांच्या थीम ठेवून झाल्या.  सगळ्या जणी  एकाच रंगात  तयार होवून आल्यावर किटीचे  माहोल अगदी कोणाकडे सण -समारंभ  असल्यासारखे वाटायचे,           किटी   असणाऱ्या  मैत्रिणीची  पहाटेपासूनची  लगबग तर विचारायलाच नको. चार-आठ दिवस आधीच तिची तयारी चालू असते.

दुसऱ्यांदा   अगदी ऋतूप्रमाणे थीम ठेवायचे ठरले.  जसेकी श्रावणात वैशालीची थीम होती एम्रॉयडरी आणि मेंदी. मग काय  विचारता. बरेच दिवस एकमेकींच्या हातावर मेंदी फासणे, सराव  करणे सुरु झाले. पण काहींना मेहेंदी काढताच येत नव्हती. मग सगळ्यांनी ठरवले कि मेहेंदी काढणाऱ्यालाच बोलवूया.  आदल्यादिवशी शोप्पिंग माल मधल्या  मेंदी काढणाऱ्याला  बोलावून  सगळ्यांचे हात एकाच दिवशी रंगून झाले. दोन्ही हात मेंदीने  रंगले असल्यामुळे,   स्वयंपाकाला   मात्र त्या दिवशी रात्रीची  हक्काची विश्रांती मिळाली. पुढच्या दिवशी-किटीच्या दिवशी मेंदीच्या भरगच्च रंगलेल्या हातां बरोबर,  आमची पार्टीही,  मेहेंदीच्या लाल रंगात  अधिकच गडद  रंगली.

 मधूने  तिची थीम ठेवली होती ' केशभूषा hairstyle ' मग काय विचारता? दिवसभर एकमेकींच्या केसांशी खेळ सुरु झाले. कधी पार्लरमधून, तर कधी नेटची मदत घेवून, तर कधी इतर मैत्रिणींची मदत घेवून  भरपूर   हेअर-स्टाईल  शिकून झाल्या. कॅर्लर-स्त्रेटनरची खरेदी झाली. काही जणी जसे मीनल, नेहा, सिमरन, आनंदिता   थीममध्ये  परफेक्ट उतरण्यात अगदीच निष्णात.  डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत पूर्ण थीम प्रमाणे बेमालूम सजून येणार.   ( नखशिखांत म्हणतात नाही का? मराठी शब्दच पटकन  आठवत नाहीत आणि कधी कधी मराठी ऐवजी इंग्रजी शब्द - over time  pregnant, project , delivery, maintainance, tour इ  अनाहतपणे तोंडात येतातच)  एकमेकींपासून प्रेरणा घेऊन सगळ्याजणी थोडे फार का होईना थीमप्रमाणे तयार होवून यायच्याच. कधी school -girl  बनून जायचे असायचे, तर कधी मिनी-मिडी मध्ये, तर कधी इंडो-वेस्टर्न स्टाईल, ग्रीष्मात फक्त सुती कपडे,  तर कधी बांधणी प्रिंट तर कधी प्रांताप्रमाणे पारंपारिक पेहराव, तर कधी ग्रामीण पेहराव.

एकदा प्रीसीने   थीम ठेवली  होती  wedding.  लग्नाच्या वेळचा आपापला पेहराव करायचा होता.   सर्वांना   नवरी  बनून जायचे होते  आणि प्रत्येकीने  लग्ना बद्दलची एक-एक गोड-कडू आठवण सांगायची  होती. सगळ्याजणी साधारण २५-३८ वयोगटातील होत्या प्रत्येकीला आठवणी सांगताना त्यावेळच्या क्षणांची अनावर  आठवण झाली आणि तेवढ्याच भावूक झाल्या. आनंदिताने सांगितले' तिच्या लग्नाच्यावेळी सर्व व्यवस्था वधूपक्षा कडे होती. नवरा मुलगा केवळ वर-पक्षाच्या खोलीत  झुरळे  सापडली म्हणून  घरची मंडळी त्याला बोहल्यावर चढवायला तयार नव्हती.   मग सगळी साफसफाई करून दिल्यावर तयार झाले म्हणे.  संध्याकाळी ठरलेले लग्न रात्री उशिरा लागले.  एकीने  सांगितले' फिरायला गेले असताना नवरी घोड्यावरून पडली म्हणून खुदकन हसणारा तिचा नवरा, नंतर त्याने तिची  माफी मागितली ती गोष्ट वेगळी.  रुचीने तर तिच्या पतिराजांना एकदम लग्नातच बघितले. आधी फोटो पाहूनच लग्न पक्के झाले होते. नव्या नवरीचा अनुभव प्रत्येकीला केव्हाच   ५-१५ वर्षे मागे घेवून गेला होता. एकमेकींच्या भावविश्वाशी जवळीक साधता-साधता  ३-४ तास कसे संपून गेले ते कळलेही नाही.

सिमरनची थीम होती प्रत्येकीने एक व्यक्तिचित्र  बनून जायचे होते. माधुरी 'माधुरी  दिक्षित' बनून आली होती, जुही ' बिपाशा बसू',  मीनल 'झीनातामान'  आनंदिता  'परवीन बाबी' वगेरे.  त्यावेळी प्रिसि मुळची, तामिळनाडू मधील  असल्याने 'जयललिता' बनली होती  आणि तिने एक छानदार  भाषणही  ठोकले. तिने   तिच्या मंत्रालयात आम्हाला  कुणाला  शिक्षणमंत्री केले तर कुणाला पंतप्रधान, तर कुणी शेतीमंत्री झाले. प्रत्येक जण आपापले खाते सांभाळण्यात कसे निष्णात आहेत हेही तिने भाषणात  सांगितले.
 वैशालीने तर कहरच केला. प्रत्येकीची नक्कल तिने अगदी हुबेहूब उतरवली.   रोजच्या संभाषणात  एकदातरी उच्चारली जाणारी वाक्ये त्यांचाच स्टा इल मध्ये,   तिच्या तोंडी ऐकून दिलखुलास हसलो. जसे कि
मीनल ----'पर्ररर्र ' हा  शब्द तिच्या बोलण्यात  रोज एकदातरी यायचाच.
रुची -------' मेरे अंशू को भी थोडा रखना यार ?'
आनंदिता  ------' ए रिशिका और शुभांगी ने तो मेरे नाक मे दम कर रखा  है'
खालिदा -----' फिरोज को तो ऐसा नही चलता'
माधुरी ----- ' नाही गं, आज ह्यांना  दुपारी  डबा द्यायचाय  नं!!!'
जुही ---- ' रुक न यार. बस और पाच मिनट, ओ मोटी कैसी है रे तू ?'

प्रत्येकीची नक्कल अगदी हुबेहूब.



 किटीत खाण्याबरोबर दोन खेळही ठेवले जायचे. खाण्याची तर खूपच चंगळ असायची. महिन्यातून एकदा प्रत्येकीच्या हातची चव चाखायला मिळायची. १२-१५ महिन्यातून फक्त एकदाच जेवणाचा बेत करायचा असल्याने सगळे पदार्थ घरीच करायचे होते, पण पुढे वर्षभर  मात्र इतरांच्या हातचे खायचे होते त्यामुळे किटी साठी जेवणाचा बेत ठेवायला सगळ्याजणी  तयार झाल्या.  बरं , खेळाचे विषय असायचे एका मिनिटाचे जसे कि एका मिनिटात बलून फुगवणे, मेणबत्त्या पेटवणे वगैरे. एकतर स्किल गेम किव्हा लक गेम.

माधुरीने नवीनच करावके सिस्टीम घेतली होती. त्यामुळे तिच्याकडे 'गाण्यांची महफिल' ठेवली होती. काहींनी सुरेल आवाजात, तर काहींनी येईल तश्या जाड्या-भरड्या आवाजात जुन्या मराठी-हिंदी-इंग्रजी  फिल्मी गाण्यांची महेफील मस्तच जमली. जयंतीचा तर गाणं हा तर आवडीचा विषय. तिनेही सुरेल आवाजात गाणी म्हटली. जुनी गाणी दिवसभर मनात रुंजी घालत होती. त्या दिवशी अक्ख्या सोसायटीला नवव्या मजल्यावरून गाणी ऐकू आली असावीत.

एकदा अशीच आमची किटी चालू होती  माझ्याकडे. खेळाचा विषय होता एका मिनिटात " नवऱ्याला प्रेमपत्र" लिहायचे होते कि ज्यामध्ये 'प्रेम' हा शब्द जास्तीत जास्त वेळा आला पाहिजे होता. काही मैत्रिणी वेगवेगळ्या राज्यातील असल्याने आपल्या मातृभाषेतही लिहिण्याची परवानगी होती. सगळ्यांनी दोनचार वाक्ये साधारण किंवा romantic  लिहिली होती. पण एका मैत्रिणीने   खूप गमतीशीर पत्र लिहिले होते.

प्रिय  xxx ,
मै तुम्हे प्यार करती हू
मै तुम्हारे मम्मिसे प्यार करती हू
मै तुम्हारे पापासे प्यार करती हू
मै तुम्हारे भाई से प्यार करती हू
मै तुम्हारे बहन से प्यार करती हू
मै तुम्हे बाथरूम मे प्यार करती हू, बेडरूम मी भी प्यार करती हू
मै तुम्हारे पेन से प्यार करती हू
मै तुम्हारे शर्ट से प्यार करती हू
मै तुमसे प्यारही प्यार, बहुत प्यार करती हू

उत्तराने सगळ्या पत्रांचे वाचन केले. तिच्या पत्राचे सामुहिक  वाचन झाल्यावर सगळ्यांजणी  अगदी हसून-हसून थकल्या. आणि तिच्या पत्रात 'प्रेम' हा शब्द जास्त वेळा आल्याने अर्थात तिला गिफ्ट देण्यात आले. परत एकत्र भेटलो कि हा विषय वारंवार निघत असे. आणि आम्ही परतपरत पोट धरून हसत असू, हा विषय अगदी महिनाभर पुरला.


आणखी काही दिवसांनी 'knowledge club ' सुरु केला. यात प्रत्येक खेपेला एक विषय घेऊन  जसे कि स्वास्थ्य, स्त्रियांचे मानसिक-शारीरिक आरोग्य, आयुर्वेद, ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय, योग आणि योगासने, मुलांचे प्रश्न हळूहळू एक-एक विषय सुचत जावू लागले आणि 'knowledge club 'चा पसारही वाढला.

नंतर  ठरवलं  कि आपल्याकडून काहीतरी समाजकार्य झाले पाहिजे. मग भारतीने एक छान कल्पना लढवली. दर महिन्याच्या ठराविक तारखेला आम्ही अख्ख्या  सोसायटीतले न्यूज-पेपर गोळा करू लागलो आणि मग महिन्याची रद्दी, रद्दीवाल्याला विकून जमा होणारी  रक्कम सामाजिक संस्थेला देणगी स्वरुपात देऊ  लागलो. ह्या कामातही सगळ्यांनी थोडाफार का होईना आपापल्या परीने खारीचा वाटा  उचलला होता.

 प्राथमिक शाळेतल्या बालिश  मैत्रिणी, माध्यमिक शाळेतल्या जाणीवपूर्वक झालेल्या मैत्रिणी, तर कधी कॉलेजच्या, ऑफिसच्या मित्रमैत्रिणी, आणि  आता ह्या किटीच्या मैत्रिणी  वेगवेगळ्या वळणांवर  भेटणाऱ्या  मैत्रिणी ज्यांच्यात आपण कधी एकरूप  होऊन जातो ते  कळतच नाही. रुसवे-फुगवेही व्हायचे पण डान्स -डिब्बा  पार्टीनंतर (तीही कधीकधी व्हायची कि ज्यात फक्त डब्बा नी डान्स अंतर्भूत होतं ज्यात रुसव्या-फुगाव्यांनाही वाट मोकळी करून दिली जायची )  पुनःश्च   एकत्र येणाऱ्या  मैत्रिणी.

मैत्रीचे विश्वच आयुष्यातला एक  सुखद  आपसूक उघडणारा कप्पा   असतो नाही ,  मैत्रीच्या पुस्तकाची पाने पुढे वाढत राहिली तरी मागे उलटून पहावीशी वाटतातच !!!


  

३ डिसें, २०१२

दुबई ....... १

 

अबू-धाबी वरून दुबईला ट्रीपला निघताना दुबई बद्दल खूप उत्सुकता होती. अबुधाबिवरून १२५-१५० km अंतरावर दुबई असल्याने  अगदी दीड तासात दुबईला पोहोचता येते कारण इकडे गाड्यांना  वेग फार असतो आणि दुबई-अबुधाबीला जोडणारा शेख झायेद रोड हा सात पदरी रोड असल्याने गाड्या अगदी सरळ रेषेत १००-१५०च्या वेगाने सुसाट धावत असतात.
दुबई हे  संयुक्त-अरब एमिरातीमधील सात एमिरातीपैकी  एक एमिरात आहे. अबू-धाबी ही राजधानी असून दुबई, शारजा, फुजैराह,  रस-अल-खैमा, अजमान, उम-अल-खैवन हे इतर एमिरेटस  आहेत.   दुबई  जगातील २२वे सर्वात महाग  आणि  मिडल इस्ट मधील सर्वात महाग पण सर्व शहरांमध्ये आवडते एमिरात आहे.

दुबई ची ओळख म्हणजे  ग्लोबल शहर, प्रवासी शहर, उंच उंच इमारतींचे,  सोन्याचा धुर निघणारे शहर, बॉलीवूड लोकांचे आवडते शहर, अंडर-वल्ड लोकांचे शहरही असे ऐकिवात आहे. अबू धाबिवरून दुबईला निघताना रस्त्यावर  त्याच्या काही टिपलेल्या मुद्रा. गाडीतून फोटो घेतल्याने तेवढी सुस्पष्टता  नसावी. प्रत्येक इमारतीची रचना किती वेगळी आहे. पत्त्यातल्या गगनचुंबी  इमारतीच  जणू.  बिल्डींग  आर्की टेक्चर चे अदभुत नमुने. (u can increase photosize by pressing "ctrl +")
 
 
अल-दार -worlds first circular skyscraper on abudhabi-dubai road




वाकडीतिकडी बिल्डींग, नाव माहित नाही.

 

 

 


 

बुर्ज अल-अरब  

बुर्ज-अल-अरब हे   दुबईतील ७-स्टार हॉटेल आहे. याला ७० मजले असून,   २००९ पर्यंत जगातील सर्वात उंच हॉटेल होते. आता ते जगातील चौथ्या क्रमांकावर आहे त्याचा आकार जहाजाच्या शिडासारखा आहे.. जुमेरा बिच पासून  २८० मीटर अंतरावर  कृत्रिम बेटावर हे हॉटेल   वसवलेले आहे. येथे कॉफी पिण्याचा खर्च आहे फक्त ३२५ दिरहाम म्हणजे   १५x ३२५  रुपये. एका वेळचा डीनरचा खर्च तर विचारूच नका.  निळा रंग मध्ये-मध्ये असलेली हॉटेलची हि पांढरी-शुभ्र अवाढव्य   इमारत बघून खरेच प्रसन्न वाटले. बाजूलाच वाडी पार्क नावाचे water  park आहे. इथेही फिरंगी लोकांची खूपच गर्दी दिसते.

 
येथून बाजूलाच अमिराती कल्चर असलेले  मदिनत सुक (madinat souk market )  एक खरेदीचे केंद्र. उच्च दर्जाचे हॉटेल्स आणि बार्सही  आहेत.  या बाजारात जगातील उत्तमोत्तम वस्तू पण जरा महागच मिळतात.   त्यामुळे विंडो शोप्पिंग केलेलीच बरी. युरोपियन लोकांची  येथे खूप गर्दी दिसली.
या बाजारातील काही  फोटो 
 
दिव्यांनी सजवलेला एक स्टाल  
शॉपिंग सेंटर मधील आरामात पहुडण्याचे  एक ठिकाण 
हुश्य !!!  इथे मात्र चालून चालून थकलेल्या पायांना  बीन  बग वर बसून जरा आराम मिळाला. 
 
 

हॉटेल अटलांटिस 

हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  पाम झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर व्हिलास वसवले आहेत. गोल दिसणारा क्रिसेंट आणि त्याच्या टोकाशी अटलांटिस हॉटेल.  पाम  जुमेराचा हा  वरतून दिसणारा view . यात म्हणे मोठ्या बॉलीवूड स्टार  लोकांचीही घरे आहेत. पाम  जुमेरा हे स्वतःच स्वताला 'जगातील आठवे आश्चर्य' म्हणवतात.
 
 पाम जुमेराच्या   शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या-मोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र.  येथे डॉल्फिन शो, वाटर पार्क आणि शॉपिंग सेंटर आहे. येथून मोनोरेलने पाम जुमेराच्या एका टोकापासून दुसऱ्या  टोकापर्यंत ५.४ किमी जाता येते.  मोनोरेलने पाम जुमेराचा दिसणारा view मनात साठून ठेवावा असा.
 
 
समुद्रकिनारी फेरफटका मारून झाल्यावर मोनो-रेल ने प्रवास केला. मोनोरेल आणि मेट्रो रेल मधील फरक अनुभवला!!!!  तसा आत विशेष फरक नाही पण मोनोरेल एकाच पठरीवरून चालते पण तिचे बीम हवेत उंच असतात. फिरताना कधी रात्र झाली ते कळलेही नाही.  मॉंल मध्ये जेवायला गेलो खरं, पण बर्गर, पिझ्झा असले खावूनच उदरभरण केले. शाकाहारी लोकांची फार पंचाईत होते. ७०-८०% लोकं इथे (expat ) दुसऱ्या देशातील असल्याने  अगदी सगळ्या प्रकारचे options जसे कि इटालिअन, मेक्सिकन, फिलिपिनी, थाई सगळ्या प्रकारचे जेवण, बहुतेक non veg  मिळते.   भारतीय हॉटेलेही आहेत. पण शोधावी लागतात.
 
 
 
बुर्ज -खलिफा - TALLEST MAN-MADE STRUCTURE IN THE WORLD

उंची ८२८ मीटर, २०० वर अधिक मजले


दुसऱ्या दिवशी बुर्ज खलीफाचे सकाळी ११ वाजताचे बुकिंग आधीच करून ठेवले होते. हि जगातील सर्वात उंच बिल्डींग असून तिच्यात २०० च्या वर  मजले आहेत. रांगेत प्रतीक्षेत असताना अरबांच्या हातच्या कॉफीचा मस्त आस्वाद घेत  होतो. लिफ्टच्या परिसरातच बुर्ज-खलिफा व इतर जगातील उंच टोवर बद्दल माहिती देणारे बोर्ड  दिसतात. २५-३० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एकदाचे लिफ्ट पर्यंत  पोहोचलो.


 बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यापर्यंत लिफ्ट जाते  तेही अवघ्या  १ मिनिटात. लिफ्ट मध्ये १ ते ६० सेकंद मोजेपर्यंत १२४व्या मजल्यावर लिफ्ट कधी पोहोचते ते समजतही नाही. कानात मात्र,  विमानात असताना जसे जाम झाल्यासारखे वाटते ना,    तसे वाटले क्षणभर.   १२४ व्या मजल्यावर पोहोचल्यावर   वाटलं,  काय विमानातूनही दिसते तसेच खालचे चित्र दिसत असेल. पण जमिनीवर राहून "Top of the world from the Land" पाहण्याची मजा काही औरच असेल नाही?observation deck  वरून ३६० degree  गोल चक्कर मारता येते. वरतून दिसणारे दुबई शहराचे दर्शन खरोखरच मनात साठून राहते. वरतून टिपलेली काही चित्रं . (u can increase the photosize by pressing "ctrl +")

 
गगनचुंबी इमारती  
 
 
 रस्तांचे जाळं ,  मध्यभागी बारीकशी दिसणारी मेट्रो
खाली दिसणारा शेख झायेद रोड 


 ही  बिल्डींग तयार होताना लागणाऱ्या गोष्टींची माहिती येथील बोर्ड दर्शवतात. जसे कि
----- एकावेळी ८० देशाचे १२००० कामगार पिक पिरीअडला काम करत होते,
----- एकूण ५७ असलेल्या लिफ्ट्स,
----- २८,००० च्या वर लागलेले ग्लास पँनल्स,
----- ९५ कि.मी. परिसरातून  कोठूनही दिसणारे बुर्ज खलीफाचे वरचे टोक इ.

 

 हा आहे दुबईचा राज्यकर्ता. शेख महम्मद बिन राशीद अल मक्तूम आणि त्याने वर  लिहिलेले मस्त quote

"The word impossible is not in the leader's dictionaries
No matter how big the challenges, strong faith, determination
and resolve will overcome them."



 





 
फोटो घेण्यात व्यस्त असलेले बाप-लेक, मागे  लिफ्टमधून परत खाली जाण्यासाठी  असलेली रांग.
 




बुर्ज खलिफाच्या समोरच दुबई मॉल मध्ये  एक मोठे संगीतावरचे  कारंजं  आहे. रोज संध्याकाळी ५ मिनीटांचा शो असतो. हिंदी गाण्यावरही कधीकधी शो असतो.
 

रस्त्यावर झाडांना केलेली रोषणाई.
 


बुर्ज -खालीफाचे प्रवेशद्वार , येथे शिल्पा शेट्टीचे राज कुन्द्राने गिफ्ट दिलेले  लक्झुरिअस अपार्ट मेंट आहे म्हणे
 
रात्री दिसणारी बुर्ज-खलिफा 
 

 
                                                 .................................... क्रमश:

२७ नोव्हें, २०१२

मागे वळून पाहता............

 

हो नाही करता करता शेवटी पुतणीच्या लग्नाला भारतात जायचे ठरले तेही अगदी एक दिवस आधी. मुलाची परीक्षा-शाळा, तसेच दोन महिन्यापूर्वीच भारतात जाणे  झालेच होते,  पण शेवटी जायचे ठरले  त्यामुळे तयारी करायलाही वेळ मिळाला नाही. तसेच घाई - गडबडीत पुण्यात पोहोचलो. साखरपुडा  दोन महिने आधीच झाला होता. त्यादिवशी हळदीचा कार्यक्रम, देवक,  दुसऱ्या दिवशी लग्नही सनई-चौघड्याच्या आवाजात अगदी  धुमधडाक्यात  पार पडले. असं  वाटलं  बर  झालं लग्नाला गेलो ते.  नाहीतरी 'लग्न आयुष्यात एकदाच होते नं  काकी......', हा पुतणीचा विचार मनात घर करून राहिला होता!



 तिसऱ्या दिवशी अबू धाबीचा  परतीचा प्रवास होता. पुणे-मुंबई महा मार्गावर मध्येच खोपोलीमध्ये नवऱ्या  मुलीचे सासर असल्याने सत्यनारायणाच्या  पूजेसाठी धावती भेट द्यावी असेही ठरले. नवऱ्या मुलीला, तिच्या  नवऱ्याच्या घरी, हसती पाहून थोडे हायसे वाटले. हळदीकुंकू, ओटी प्रसाद वगैरे घेतला  . जाताना 'काकी' म्हणून गळ्यात  पडली आणि खूप खूप रडली बिचारी.  आम्ही तिचा निरोप घेवून परत गाडीत बसलो

 आणि नकळत विचारचक्र सुरु झाले. शहरात वाढलेली हि मुलगी, ह्या नगरात दिवसभर काय करेल बुवा? नवऱ्याची ड्यूटी थोडी लांब पनवेलला असल्याने त्याला सकाळीच घराबाहेर पडणे भाग असेल. मग हि दिवसभर काय करेल? कि तिचेही आयुष्य तुझ्या-माझ्यासारखेच सासू-सासरे, घरकामे, जेवणखाण  यातच तिचा दिवस निघून जाईल. शिक्षण बिफार्मसी झाले असल्याने पुढे - मागे नोकरी करेल कि जमणार नाही !!!  पण सुट्टीच्या दिवशी ती कुठे फिरायला जाईल बरे . आमची  विकेंड साजरा करायची कल्पना म्हणजे, माल शॉपिंग किंवा पिक्चर किंवा उगाचच भटकणे, खरेदी, मित्रमंडळी इ . मग ती इकडे  काय करेल बरे?  ती व्यवस्थित सेट होईल ना?  सासूसासरे तिच्याशी जमून घेतील न? असे हजारो प्रश्न मनात येऊ लागले.   शेवटी प्रत्येक मुलीचे आयुष्य लग्नानंतर असेच असते हे मनाशी पटवले . माहेरी लाडाकोडात वाढलेली मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. माहेरची नाळ तोडून  सासरच्या नव्या  नात्यांशी सोयरिक जुळवता-जुळवता ती त्यातच कधी  एकवटून जाते हे तिचे तिलाही कळत नाही. तिच्याबाबतीतही  असेच घडेल हा विश्वास वाटू लागला.

हा विचार करून माझ्याबरोबर  तो ही थोडा अस्वस्थ झाला. परत  गाडीत बसल्यावर  त्याने माझा हात नकळत घट्ट पकडून ठेवला. मी म्हटले काय झालं  रे बाबा ? इतकं अस्वस्थ व्हायला काय झालं?   तो म्हणाला - १३ वर्षांपूर्वी  तू ही  अशीच माझ्याबरोबर घरच्यांचा विचार न करता केवळ माझ्या विश्वासावर , सगळं- सगळं  मागे टाकून आली होतीस. आई-वडील, भाऊ-बहिण असलेल्या त्याच्या छोट्याश्या घरात मी ही असाच अलगद, समजून-उमजून  प्रवेश केला होता.  माहेरचा त्यावेळी आधार नसल्याने पुढे काय होईल हेही माहित नव्हते. त्यावेळी माझ्या मनाची  झालेली चलबिचल, माझ्या त्यावेळच्या भावनांचा ओलेपणा  त्याला जाणवला  होता.  त्याच भावना, तीच उत्कटता, तीच अस्वस्थता, तोच उत्साह  आज त्याने,   पुतणीच्या रूपाने ,  १३ वर्षांनी, पुन्हा अनुभवला.

मी केलेल्या so  called त्यागाची (लग्नानंतर प्रत्येक मुलीला कराव्या लागणाऱ्या)   त्याला आवर्जून जाणीव  झाली.  मला  अपेक्षित असलेले  आनंदी आयुष्य तो  देऊ शकला, मी खरोखरीच खूष  आहे ना  ह्याची शाश्वती आणि पावती  माझ्याकडून मिळाल्यावर नकळत त्याचेही डोळे पाणावले आणि तृप्ततेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागला.

एक्प्रेस हायवेला गाडी भराभर रस्ता कापत  होती. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी  झाडे अधिकच हिरवीगार भासू लागली. तिचेही सगळं  काही सुरळीत होईल या आशेने आम्ही पुढील प्रवासाला मार्गस्थ झालो होतो.

१२ नोव्हें, २०१२

तिचे अस्तित्व ..... अव्यक्त

 तिचे अस्तित्व  अलिप्त, अपर्याप्त ..... अव्यक्त

ती अगदी लहान असल्यापासून एक नेहमीसारखी शाळेत जाणारी एक गोंडस कळी  होती. स्वातंत्र्य  मिळायच्या आधीच्या एक वर्ष आधीचा  तिचा जन्म. त्याकाळची १० वी म्हणजे शिक्षणाचा ब-यापैकी मोठा पल्ला म्हणायचं. बघता बघता शिक्षण संपून लग्नही झाले.  शहरातल्या एका औषध कंपनीत नोकरीही थोडे दिवस चालू होती.  सर्व काही सुरळीत चालू होते.

पदरी  लगोलग  दोन मुलीही झाल्या. कर्मधर्मसंयोगाने तिसरीही मुलगी झाली आणि काही कळायच्या आताच तिला वेडा चे झटके येवू लागले. छोट्या मुलींना तर जग म्हणजे काय हेही  कळत नव्हते. थोडे काही झाले तर आईच्या कुशीत लपू पाहणारे मुल, त्यांना जवळ घ्यावे हे ही  तीला  कळत नव्हते . हळूहळू घरात भांड्यांची आदळ  आपट  , वायफळ बडबड करणे,  मुलींना मारझोड करणे सुरु झाले. अहोंनाही  तिला कसे आवरावे कळत नव्हते. डॉक्टरी उपायही करून झाले. पण परिस्थिती जैसे थे. मग घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही  होणारा  त्रास कमी करण्यासाठी,    खात्रीचा उपाय म्हणून शेवटी कोर्टाची परवानगी घेवून तिला उपचारासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये  भरती करण्यात आले. गोळ्या-औषधे, शॉकट्रीटमेन्ट इ. इलाज झाल्यावर घरी आणण्यात आले.  थोड्या दिवसांनी परत  तीच  कथा. त्यातच पदरात आणखीन एक  कन्ये ची भर पडली. पुन्हा दोनतीनदा मेंटल हॉस्पिटलचे दौरे-तीच शॉक ट्रीटमेन्ट , तिच्या जीवाची आणखीनच घालमेल होत होती. पण नव-यापुढेही   दुसरा इलाजच नव्हता. यातच पुढची १०-१२ वर्षे गेली.

 मग कोणी ओळखीच्यांनी  सुचवल्यावर मानसिक आरोग्य केंद्रात  उपचार सुरु केला. आणि तिचे तऱ्हेवाईक  वागणं  व बोलणे ब-यापैकी आवाक्यात आले.  पण त्यानंतर ती  एक लहान मुलच  झाली. घराची  चौकट न ओलांडता येणारी,  रोजची औषधे, जेवणे , झोपणे  आणि लहान मुलासारखेच भांडणे, हट्ट करणे हाच दिनक्रम आजतागायत सुरु आहे. कधी कधी वाटते यात तिची स्वत:ची काय चूक होती. तिनेही  एका सामान्य स्त्रीसारखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण दैवाने तिला काय दाखवले? अजूनही गेली ३०-३५ वर्षे   ती गोळ्या औषधे यांच्याच गर्तेत अडकली आहे.  दुर्देवाने त्यातच पडण्याचे निमित्त होवून आलेले पंगुत्व. वॉंकरचा आधार घेवून घरातल्या घरात  चालता येण्याजोगी स्थिती. पण तिचे मन मात्र कायम एका लहान मुलासारखेच. 

लहान मुलासारखेच भांडणारी,
 
वेगळे काही खायला हवे म्हणून अट्टाहास करणारी , 
 
कधी शरीराच्या दुखणाऱ्या,  थकलेल्या अवयवांची जाणीव होणारी ,

नकळत  अश्रूंनी भरून येणारे, पण कारण न सांगता येणारे  तिचे डोळे,
 
मधेच अनंतात विलीन झालेल्या अहोंची  अस्वस्थ करणारी  आठवण,

मधेच  तिला कधी रिक्ष्याने ऑफिसला  असते, तर  कधी  कोणी गावाला बोलावलेले असते,    कधी मुली सासरहून येऊन  दारात उभ्या असतात  असे होणारे विचित्र  भास,



तर कधी स्वत:चीच स्वत:शी  चाललेली मुक्त  बडबड.

मघ कधी कधी प्रश्न पडतो?  काही व्यक्तींच्या बाबतीत असे का घडते? यालाच नशीब म्हणायचे कि  आपण स्वत:च आपले नशीब घडवू शकतो यावर विश्वास ठेवावा कि नाही हा पडणारा प्रश्न,
 
किंवा पहिला श्वास आणि शेवटचा श्वास आपल्या हातात नसणाऱ्या,  आणि त्या दोन श्वासांच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांचे उत्तरदायित्व आपण स्वत: स्वीकारावे का ?
 
 की , पूर्वजन्माचे संचित कर्म ?????
 पूर्वजन्मीचे संचीत  कर्म मानले तरी मग तिला स्वत:ला   या जन्मात ,  पापपुण्याचा  हिशोब करण्याची एक संधी,   नवीन कर्म संचयनाचा काहीच अधिकार नाही का ?


नकळत कवयत्रीच्या ओळी आठवतात.

त्या पैलतीरावर  .............. मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ         ......... सोबत आणि उबारा.
 

आजारपणाचे निमित्त

आजारपणाचे निमित्त





मला कुठली गोष्ट होऊ नये  विचारलं तर ती म्हणजे कधी आजारी पडणे. पण माहिती आहे की  याला इलाजच नसतो. बाकी विशेष नाही पण वर्षातून  एक-दोनदा येणारे व्हायरल आजार कधीकधी डोकं वर काढतातच. आजारी पडल्यावर सर्व संसारी स्त्रीयांना   होणारी अडचण म्हणजे घरातल्या कामांचे कसे होणार????? हा एक मोठा प्रश्न  उभा ठाकतो.  इतर कामांचे राहून गेले तरी  चालून जाते पण स्वयंपाकाचे, आणि त्यानंतर लागून येणारी कामे , भांडी, ओटा , फ्रीज मध्ये सारखे ठेवणे-काढणे  याचं  काय?

 एकतर कुटुंबात इनमिन तीन माणसं. जेवायला तिन्ही वेळा तर हवेच त्यात अहोंचे पाक कौशल्य चहा, दुध गरम करणे  आणि मी स्वत: समोर असल्यांवर,     सांगितल्याप्रमाणे,   क्रमाने,  मोजून पदार्थ घालून,  वरणाला घालता येणारी फोडणी,  इथपर्यतच मर्यादित.   आणि नंतर ओट्यावर होणारा पसारा जसेकी लवंडलेली मोहरी,
कांद्या-लसणाची सालपटं,
टोमाटोच्या फोडींच्या गळणाऱ्या  धारा,
अन कोथिंम्बिरीच्या काड्या,
आणि वर भांडयांचा पसारा    बघून आधीच  आजारी असलेल्या मला,  घेरी येण्याचीच बाकी असते.

त्यात इथे दुसऱ्या देशात राहायला आल्यापासून पुण्यातल्या सारखी कामवालीही मदतीला नाही. भांडी, झाडलोट, सणावाराला  स्वयंपाकातही मदत करणारी सुमन, तिची खूपच आठवण येऊ लागते.   इथे कामवालीचा मोठा प्रश्न. बांगलादेशी पुरुषही  इथे घराची कामे करतात  किंवा श्रीलंकन बायका. पण इथल्या कामवालीचा पगारही अवाढव्य.  त्यात तिलाही शुक्रवार-शनिवार सुट्टी, मग फक्त पाचच दिवसांसाठी  कामवाली ठेवावी की   नाही हाही प्रश्न होताच. तिच्या पगारएवढी रक्कम भारतीय चलनात रुपांतर केल्यास होणारी काही  हजार रक्कम. मग तेवढीच रक्कम   माझ्या खात्यात माझ्याच सांगण्याप्रमाणे अगदी ठराविक तारखेला  जमा होत होती. त्यामुळे कामवालीच्या मदतीची अपेक्षा  करणे  चुकीचेच. 

बर हॉटेलांची ही  इथे-अबू धाबीत  बऱ्यापैकी  चलती आहे,  दक्षिण भारतीय लोकं  खूप असल्याने त्यांच्या  पद्धतीची हॉटेलं . एखाद्यावेळी इडली-डोसा-सांभार  चालून जाते पण रोज तेच खाणे, सारखे-सारखे हॉटेल चे खाणे  नको वाटते. घरचे  साधे वरण-भातही  आजारपणात  बरे वाटते. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न काही केल्या  उरतोच.  आणि मग मात्र  त्या काळात अहोंना पूर्ण जाणीव होते ती
                      अरे संसार संसार
                     जसा तवा चुल्यावर
                     आधी हाताला चटके 
                     मग मिळते (बायकोला, मुलाला  आणि मलाही ) भाकर


अश्यातच चार-पाच दिवस गेल्यावर मग जरा बरे वाटू लागते,  बऱ्याच जणांना आजारी असल्यावर औषधं घेतल्यावर गाढ झोप लागते, पण माझे डोळे मात्र टकाटक रात्री उघडे असतात आणि मग अजून चिडचिड होते कारण दुसऱ्या  दिवशीचे स्वयंपाक घराचे चित्र डोळ्यासमोर उभे ठाकते आणि मग  खरेच  वाटते हे आजारपण येवूच नये आणि आलेतरी पटकन संपावे.
 

३१ ऑक्टो, २०१२

मुलांना वाढवताना

(better parenting thoughts collection)
 
मुले ही  देवाघरची फुले म्हणतात ते खरेच. पण त्यांना वाढवताना, त्यांचे पालनपोषण करताना  खरोखरच काही गोष्टी नकळत आपल्याही लक्षात येत नाहीत किंवा त्याची परत परत कोणीतरी आठवण करावी लागते. अशीच काही वाचलेली, आवडलेली मुलांबद्दलची   टिपणे :----
 


* शरीरस्वास्थ्य 

 बालपणी कमावलेले शरीर हे fix deposit सारखे असते जे आपल्याला आयुष्यभर साथ देते म्हणून मुलांना पौष्टिक आहार द्या. निसर्गाने दिलेले पदार्थ  आणि कृत्रिम पदार्थ, त्यांचे फायदे-तोटे  यांचे ज्ञान मुलांना द्या.

* गृह्स्वास्थ्य 

मन आणि विचार जागा व्यापत नसल्याने घरातल्या एका कणात सु द्धा जगातले सर्व विचार राहू शकतात. म्हणून घरात कोणाचाही मत्सर करू नये . आपले विचार वातावरणांत वर्षानुवर्षे टिकतात. आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो.  कारण आपल्या मत्सर शक्तीचा त्रास मुलांना अधिक होतो.

* मुलांना सर्वात मोठे tention (८०%) कोणाचे असते ?

पालकांचे ----- परवलंबीपणाचे, पालकांच्या अपेक्षेचे . मुलांना कपडे, खेळणी  हवे असले तर निवड कोण करणार? आई-बाबा. असच खाल्लं पाहिजे, एवढंच खाल्लं पाहिजे, एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, असे करू नको ,   हे मुलांना आवडत नाही. या बारीक-सारीक कारणांनीही मुलांना वाईट वाटते. म्हणून मुलांच्या आवडीनिवडी लक्षात  घ्या. चौरस आहाराची मुलांना कल्पना द्या. त्यांच्या निवड कशी चांगली आहे हे त्यांच्यादृष्टीने समजून घ्या.

* मुलांना मारण्यामुळे मुले असुरक्षित फील करतात.

मुलांकडून चूक झाली तर  मुलांना  मारहाण होते पण त्यामुळे मुलांना  असुरक्षित वाटते , मुले घरात, शाळेत कायम भीतीच्या छायेत वावरत असतात. मुलांना न मारता आत्मशासन करा जसे स्वतः न जेवणे,   अबोला धरणे इ .

*मुलांना उपदेश आवडत नाही.

दिवसभर आपण मुलांना या न त्या प्रकारे उपदेशच करत असतो पण आपणही तसे वागतो का?  let your action speak

* मुलगा नीट वागत नाही ?

मुले आई-वडिलांचे निरीक्षण करतात. ते आपली xerox कॉपी असतात. तो चुकीचा शिकला तर दोष कोणाचा?

* मुलगा अभ्यास करत नाही?

घरातील वातावरण मुलांच्या अभ्यासासाठी  पोषक आहे का?  मुलगा अभ्यास करताना घरात शांतता पाहिजे. टीव्ही, गप्पा-टप्पा  बंद.  मुलगा अभ्यास करेल त्यावेळी मीही काही वाचीन, त्याच्या अभ्यासात रुची दाखवेन.

* मुलगा शाळेला दांडी मारतो?

मी ऑफिस मध्ये मस्टरवर सही करून क्रिकेटची match  बघायला जाईन हे बाबांचे बोलणे मुलगा ऐकतो आणि दांडी मारणे हे काही चुकीचे नाही असे तो समजतो  आणि तो ही तसाच वागतो .

* मुले खोटे बोलतात?

अमुक व्यक्तीचा फोन आला कि त्या व्यक्तीला फोनवर सांग कि मी घरी नाही आहे हे मुलांना कोण शिकवतो? आपणच.  मग खोटे बोलणे हे चुकीचे असते हे मुलांना कळणारच कसे?

*मुले गोष्टी लपवायला शिकतात / चोरी करायला शिकतात

मी ऑफिसमधून पेपर,  पेन आणून देईन. कोणाचेही घ्यावे आणि वापरावे हे कोण शिकवतो? आपणच .

* मुले खोड्या काढतात ?

मुलांना त्यांच्यातील शक्ती कोठेतरी वापरायची असते. यांना चांगल्या खोड्या काढायला शिकवा किंवा त्यांची शक्ती इतर गोष्टीत जसे पोहणे, पळणे chanalise करा.

* मुले रागावतात ओरडतात ?

आत्मपरीक्षण करा. आपण रागावतो आहे का? घरात आपण सारखे ओरडतो आहोत का? आपलेही घरातील वागणे तसे आहे का?

* मुलगा स्वार्थी आहे?

स्वार्थ कोण शिकवतो? मुलगा शेजारच्याला चोकलेट , खाऊ  देतो आई म्हणते ते महाग आहे दुसऱ्याला देवू नकोस. स्वार्थ कोणी शिकवला? आपणच ना ?

* मुलगा ऐकत नाही?

मुलांवर अगदी मनापासून प्रेम करा. प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आज्ञा मुले कधीच मोडत नाहीत.
 

* कृतज्ञ मुलगा हवा?

पालकांनीही वडील-माणसांशी कृतज्ञतेने वागायला हवं. आई-वडिलांना कमी पडले तरी चालेल पण मुलांना पाहिजेच असे आपणच वागतो. मुलेही मोठेपणी तसेच वागतात, आपल्याच मुलांना प्राधान्य देतात.. म्हणून आई-वडिलांचे प्रेम आई-वडिलांना द्या, मुलांचे प्रेम मुलांना द्या.
 

                                                                                              सौजन्य : मन:शक्ती 


२२ ऑक्टो, २०१२

मी कोण ?????




कुठेतरी ऐकलेले आठवते                      




तुम्ही कोण आहात? -----


 -  आपण जेथे राहतो ते घर,
 -  घर जिथे आहे ते गाव 
 -  ते गाव  ज्या शहरात  आहे ते शहर
 -  ते शहर  ज्या राज्यात आहे ते राज्य
 -  ते राज्य ज्या देशात आहे तो भारत देश
 -  भारत देश आणि असे हजारो देश  ज्या खंडावर आहे ते आशिया खंड-
 -  आशिया खंड आणि उत्तर ध्रुव , दक्षिण ध्रुवा  सकट  अनेक खंड  ज्या पृथ्वीतलावर आहे ती पृथ्वी -
 -  पृथ्वी जी बुध, मंगल गुरु, शनी आणि इतर ग्रहांबरोबर  ज्या आकाशमालेत  आहे ती सूर्यमाला,
 -  असे  अनेक सूर्य आणि त्यांचे ग्रह असलेल्या अनेक  सूर्यमाला मिळून  बनलेली  आकाशगंगा
 -  आणि  अस्तित्वात असलेल्या अशा  अनंत कोटी कोटी  आकाशगंगा


असा व्यापक विचार केला तर आपले अस्तित्व  एक पुसटसे बिंदूही  नाही.
तरीपण आपले विश्व हे आपल्या परीघापर्यंतच  मर्यादित राहते आणि त्या परिघात सामावलेल्या व्यक्ती, दिवसभर ऑफिसात/घरात त्यांची  स्क्रिप्टे   उतरवण्यात कायम बिझी-बिझी  असलेलो आपण. 
(whole day we are busy in writing other persons script -  he should not have behaved like this, he should have done like that, he is responsible for that, not I  ...... )

कधी कधी प्रश्न पडतो------

मी कोण???


कधी वाटते-

थबकले उंबऱ्यात मी, पाहुनी नवी पहाट
जणु जन्मले नव्याने, जडता हा मळवट
हाती संसाराचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका


तर कधी वाटते-
बाबांच्या आयुष्याच्या काही शेवटच्या संध्याकाळी  आजारपणात सोबत घालवलेल्या काही रात्री आणि त्याकाळात करता आलेली त्यांची सेवा यातच आयुष्याची धन्यता मानणारी एक भाग्यवान कन्या.

तर कधी वाटते -
जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आणि लाभलेले अनमोल पुत्ररत्न यांच्याशिवाय दुसरे काहीच न दिसणारी घराच्याच चौकटीत अवघे विश्व सामावलेली आणि त्यातच रमणारी एक सामान्य पतिव्रता(??) - माता(नो ?).


तर कधी वाटते -
आयुष्य एकदाच मिळालेल्या जीवनाचा प्रत्येक क्षण नाविन्य उपभोगण्याची अनावर इच्छया असलेली, कायम मैत्रीच्या विश्वात रमणारी, भिश्या, किट्टी पार्ट्या झोड्णारी, मैत्रीचे अनुबंध जोडणारी-जोपासणारी एक सखी

तर कधी वाटते -
रोजच्या धावपळीत तना च्या स्वस्थतेसाठी शारीरिक व्यायाम , मनाच्या शांततेसाठी मानसिक व्यायाम(मेडीटेशन) यातच relaxation शोधणारी एक जागरूक हेल्थ कॉन्शस आधुनिक स्त्री?

तर कधी वाटते-
स्वत:ला आरशात न बघता, स्वतः कडे बोट न दाखवता दिवसभर इतरांचे मात्र script वर script, script वर script उतरवणारी,
स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्यांना बदलवू पाहणारी ,
स्वत: च्या tension ची कारणे स्वत:त न शोधता बाहेर शोधणारी
आणि ही आपली स्वार्थी वृत्ती, पदोपदी जाणवणारी, जगाच्या पदपथावरील एक पामर.

२० ऑक्टो, २०१२

आजोळ एक सुखद कप्पा - कोंकण



आजोळ एक सुखद कप्पा  -  कोंकण 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हडी नावाचे एक गाव आणि या गावातील जुवा पाणखोल नावाचे छोटेसे   बेट.  बाजूलाच आणखीन एक बेट - त्याचे नावं बंड्या-आणि त्याला लागूनच तोंडवळीचा किनाराही दिसतो.  मालवणपासून जवळजवळ ८ किलोमीटरवर हडी हे गाव आहे. मुख्य रस्त्याला लागून एका आडवळणाने अर्धा km गेले कि लांबूनच जुवा  बेट  दिसते.  या बेटावर अगदी  मोजकीच ३०-३२ घरे आहेत. बेटावरून कुठेही जायचे म्हटले कि होडीशिवाय पर्याय नाही.
 
 
 
 
गाडी किनारी पोहोचताच बेटावर जाण्यासाठी होडीवाल्याला कुउऊ  करून  कुकारे दिल्याशिवाय होडी येणार कशी?
 
 
आता या बेटावर उतरायचे आहे.
 
 
 
आणि नंतर होडीत बसल्यावर ५-७ मिनिटातच बेटाच्या किनारी पोहोचता येते.
 
 
 
 बेटावर उतरल्यावर घरापर्यंत थोडे पायवाटेने चालायला तर हवे.
 
 
पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर लागणारी पायवाट.
 

आणि हे आमचे माडाच्या बनांत लपलेले  छोटेसे टुमदार घर. बाजूलाच दिसणारी खोपी . रस्त्यातच वाळत टाकलेली सोले (आमसुले), मिरच्या, वाल  इ.
 
प्रवासातून थकून आल्यावर आंघोळ तर पहिली पाहिजे नाही का? केवढे मोट्ठे पातेले.विहिरीतून पाणी काढून  चुलीवर तापलेले कढत-कढत पाणी. यात तर सगळ्यांची आंघोळ होईल.
 
 
 
नाष्टा झाल्यावर सकाळी १०-११ वाजता उकड्या तांदळाची पेज, दुपारी मस्त मालवणी  जेवण होते. संध्याकाळी काय करावे बरे?  बाहेर नारळाच्या झावळांनी आच्छ्यादलेला खळा . त्यावर  टाकलेल्या माच्यावर (सोफा) आराम करूया.
 
 

 
 
आम्हा मुलांना  येथून उतरायचेच नाही.  उंच-उंच गवतावर  खूप छान वाटतेय.
 
 
खोपीच्या बाजूला संध्याकाळी भाताची चाललेली मळणी. मध्यभागी खांब रोवून रेड्यांना सलग ओळीत बांधून त्यांच्या पायाखाली भाताची रोपे तुडवून भाताच्या 
साळ्या सुट्या होतात.
 
 
मुलांना  पण रेड्यांच्या मागे पळायचे असते.
 
 
 
 
आज पोहायला जायचे आहे !!!! होडीतून थोडे उथळ जागी  जाऊया कारण पोहता येत नाही ना अजून.
 
 
 
 
 
खाडीच्या पाण्यात डुबक्या मारताना काय मज्जा येते नाही??
 
समुद्रकिनारी वाळूचा किल्ला करतोय कसा वाटतोय??
 
 
संध्याकाळी दिसणारे ढगांनी झाकोळलेले बेटाचे  नयनरम्य दृश्य 
 
उन्हाळ्यातील दिवसात आंबे-फणस  खाण्याची मजा काही औरच.
 
 
 
 
 
 
 
बेटावरील नारळाच्या झाडांनी वेढलेली  भाताची शेते 
 
किना-यावरून दिसणारा सूर्यास्त.....